नबाबगंज येथे कोट्यावधीचे घबाड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील प्रयागराजनजीकच्या बरईपूर रामनगर या गावात काही शुक्रवारी प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तळघरात ठेवण्यात आलेली, 500 रुपयांच्या नोटांच्या गठ्ठ्यांनी भरलेली तीन पिंपे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या नोटांची गणना करण्याचे काम हाती घेण्यात आले असून किमान 60 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप प्राप्तीकर विभागाने हे घबाड किती मोठे आहे, याची माहिती प्रसिद्ध केलेली नाही. आता या संपूर्ण घराचा कानाकोपरा तपासण्यात येत असून या घराचे मालक बंधू राजेश यादव आणि राकेश यादव यांची चौकशी करण्यात येत आहे. राजेश यादव हा 15 वर्षांपूर्वी मुंबईत एक सामान्य नोकर म्हणून कामासाठी गेला होता. मात्र, परत आल्यानंतर त्याने आपल्या गावाजवच्या भागांमध्ये आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंडांची खरेदी करण्यास प्रारंभ केला. या कामी त्याला त्याचा बंधू राकेश यादव याचेही साहाय्य झाले. मुंबईत राजेश यादव एका सराफी दुकानात काम करत होता. त्याच्याकडे एवढा पैसा कसा आला, याची चर्चा गावात होत असल्याने सरकारी यंत्रणांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यामुळे त्याच्या घरावर प्राप्तीकर विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी धाड घातली आहे, पुढची चौकशी केली जात आहे.
