आई-वडील, बहिणीवर कोसळले महासंकट
त. भा. प्रतिनिधी
वास्को : आधीच गरीबी आणि त्यात मुलांच्या मृत्यूचे महासंकट कोसळले. एक किंवा दोन नव्हे तर एकाच कुटुंबातील तब्बल तीन युवकांना क्षणात काळाने हिसकावले. आई-वडिलांसमोर केवळ हंबरडा फोडण्यावाचून आता पर्यायच राहिलेला नाही. परतण्यापूर्वी चार घास खावेत म्हणून आईनेच त्यांना डबा भरून दिला होता. मात्र, काळानेच त्यांचा घास घेतला. त्या युवकांच्या दुर्दैवी मृत्यूने वास्को नवेवाडेतील परिसरात हळहळ पसरली आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही बातमी वास्कोत धडकली आणि नवेवाडेतील त्या वस्तीत दु:खाचे सावट पसरले. कुटुंबावर तर महासंकट कोसळले. नवेवाडे वास्कोत एका घरात भाड्याच्या खोलीत राहणारे हे मदार कुटुंब मूळ कर्नाटकातील विजापूरचे. गेले अनेक वर्षे इकडून तिकडे भाड्यानेच राहणारे. कुटुंबाची परिस्थिती बेताचीच. वडील कामधंदा नसलेलेच. आई लोकांच्या घरात काबाडकष्ट करणारी. वडिलांपेक्षा तिचाच मुलांना अधिक आधार. मुलांनी रोजगार मिळवण्यासाठी काही तरी शिकावे ही आईची इच्छा. त्यामुळे राम आणि लक्ष्मण हे जुळे बंधू वास्को-बोगदा येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते. तर मोठा भाऊ हिरण्णा आणि मोठी बहीण काम करून घरखर्चाला हातभार लावत आहेत. राम आणि लक्ष्मण या दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कुठे तरी नोकरी-धंदा करतील आणि आजच्यापेक्षा चांगले दिवस पाहायला मिळतील अशी आशा या मदार कुटुंबाला होती. मात्र, नियतीच्या मनात भलतेच होते. तिने डाव साधला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. भविष्याची गोड स्वप्ने पाहत कमावणारा आणि शिकणारे असे तिघे बंधू कुळेतील दूधसागराच्या डोहात बुडून मरण पावले. धक्कादायक आणि हदयद्रावक अशी ही घटना. आई, वडील आणि बहिणीवर महासंकट कोसळले आहे.
कुळेला दूधसागरकडे पिकनिकला जायचे तर वास्को स्थानकावर सकाळची साडे सातची लोकल ट्रेन पकडायची आणि संध्याकाळी त्याच ट्रेनने परत वास्कोकडे परतायचे हा वास्कोवासियांचा गेल्या अनेक दशकांपासूनचा शिरस्ता आहे. हिरण्णा, राम आणि लक्ष्मण हे मदार बंधू तसेच विजय आणि राहुल हे मित्र अशाच बेताने साडेसातची ट्रेन पकडून पिकनिकला निघाले होते. ते संध्याकाळच्या ट्रेनने परत येणार होते. दुपारी मुलांनी पोटभर घास खावेत यासाठी आईने त्यांना पहाटे उठून चिकन बनवून दिले होते. मात्र, ते घास खाण्यापूर्वीच काळाने तिच्या मुलांचाच घास घेतला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.