For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

11:26 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
Advertisement

चंदन होसूर येथील घटना : झटापटीत महिला जखमी

Advertisement

बेळगाव : केवळ पंधरा मिनिटांत 25 लाख  रोकड असलेली बॅग पळविल्याची व घरासमोर सडा-रांगोळी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन हिसकावून घेतल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी चाकूचा धाक दाखवून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. चंदन होसूर, ता. बेळगाव येथे रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत महिलेच्या हाताला चाकू लागून जखम झाली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हे कृत्य केले आहे. शोभा नागाप्पा तवगद (वय 36) रा. चंदन होसूर यांनी फिर्याद दिली आहे. शोभा व त्यांच्या घराशेजारील आणखी दोन महिला रविवारी सकाळी चंदन होसूर-बसरीकट्टी रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. दोन महिला पुढे होत्या, थोड्या अंतरावर शोभा एकट्या चालत येताना ही घटना घडली. हेल्मेट परिधान केलेले दोघे भामटे दुचाकीवरून आले. शोभा यांना चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. यावेळी शोभा यांनी दागिने काढून देण्यास नकार दिला. एका भामट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारला. तरीही या महिलेने गळ्यातील दागिने घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे मंगळसूत्राचा तुकडा खाली पडला. भामटा व शोभा यांच्यात झटापट झाली. झटापटीत भामट्याच्या हातातील चाकू लागून शोभा जखमी झाल्या. त्यांच्यावर स्थानिक इस्पितळात उपचार करण्यात आले. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक गुरुशांत दाशाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टोळी इराणी की स्थानिक?

Advertisement

दि. 9 मार्च रोजी सकाळी 6 वा. अशोकनगर येथे आपल्या घरासमोर सडा-रांगोळी करणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या अंगावरील दागिने पळविले होते. यामागे इराणी टोळीतील गुन्हेगारांचा हात असल्याचा संशय बळावला होता. रविवारी सकाळी चंदन होसूर येथे झालेल्या घटनेनंतर महिलांना गाठून लुटणारी टोळी इराणी आहे की स्थानिक आहे? असा संशय निर्माण झाला असून सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :

.