For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष कैवल्यपद मिळवतो

06:52 AM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
अनासक्त राहून कर्म करणारा  पुरुष कैवल्यपद मिळवतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, तो विषयांत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवितो. स्वकष्टाने एखादे कार्य करून ते देवाला अर्पण करणे हे यज्ञ केल्यासारखेच आहे. परमेश्वराने त्याच्या उदरनिर्वाहासाठी अन्नसाखळी तयार केलेली आहे. जो उन्मत्त मनुष्य स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण न करता, वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियांचे लाड पुरवितो, तो केवळ पापांच्या राशी रचत असतो. म्हणून स्वधर्म कोणीही सोडू नये. जे लोक शारीरिक कष्ट होतील किंवा द्रव्य खर्च होईल ह्या विचारांनी अथवा आळसाने कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते लोक अज्ञानामुळे फक्त स्वत:पुरते पाहणारे असतात. जो मनुष्य निरपेक्षपणे, स्वधर्माचे आचरण काया, वाचा, मनाने करत राहतो तो आपोआपच संपूर्ण निस्वार्थी होतो. त्याला आत्मस्वरूपाची ओळख होते.अशी ज्याला आत्मस्वरुपाची ओळख झालेली आहे त्याच्याबद्दल बोलताना पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेला असतो, तो आत्मानंदाने तृप्त व संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही.

परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो । आत्म्यामध्ये चि संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले ।। 17 ।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जो आत्मस्वरूपामध्ये अखंड रममाण असतो त्याच्याबद्दल बोलताना भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. त्याला आपण देह नसून आत्मा आहोत ह्याची पुरेपूर खात्री पटलेली असते. त्याच्या देह-इंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालू असताना देखील हे कर्म मी करत नाही अशी त्याची खात्री असल्याने तो त्यामध्ये गुंतत नाही.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, जो मनुष्य निर्लेप होऊन कर्मे करत असतो तो केवळ एक कर्तव्य म्हणून ती करत असतो. या लोकी कर्म केल्याने अथवा न केल्याने त्याला काही लाभ हानी होत नाही. त्याला कुणाकडून काही लाभ मिळवायचाही नसतो.

केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा । कोणामधे कुठे त्याचा न काही लोभ गुंतला ।। 18।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप आपोआप संपतो, त्याप्रमाणे जो आनंदस्वरूप आत्मतत्वाशी एकरूप झालेला असतो त्याला कर्म करण्याचे प्रयोजनच शिल्लक राहत नाही. आत्मज्ञान होईपर्यंत कर्मादी साधने मुद्दामहून करावी लागतात. आत्मज्ञान झाल्यावर ती ईश्वरी प्रेरणेने आपोआप घडतात.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, अर्जुना, आपण म्हणजे हा देह नसून आत्मा आहोत हे ओळख आणि कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून कर्तव्यकर्म कर. अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष कैवल्यपद मिळवतो.

म्हणूनि नित्य नि:संग करी कर्तव्य कर्म तू । नि:संग करिता कर्म कैवल्य-पद पावतो ।। 19 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सदैव फळाची आशा त्यागून तू उचित अशा स्वधर्माचे आचरण कर. हे पार्था ! जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात, ते श्रेष्ठ असे कैवल्यपद मिळवतात.

पुढील श्लोकात भगवंत जनक महाराजांच्यासारख्या कर्मयोगी व्यक्तीचे उदाहरण देऊन सांगतात, आसक्ती रहित कर्म करूनच जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. यासाठी तू सुद्धा लोकसंग्रहाकडे, लोकहिताकडे लक्ष देऊन कर्म करणे योग्य आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.