For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्थिरबुद्धी मनुष्य जे मिळेल त्याचा स्वीकार करत पुढे जात असतो

06:20 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्थिरबुद्धी मनुष्य जे मिळेल त्याचा स्वीकार करत पुढे जात असतो
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

माउली सांगतात, निरिच्छ व्यक्तीला आत्मज्ञान झाले असल्याने तो सगळ्यापासून अलिप्त राहून व्यवहार करत असतो. असा मनुष्य आपल्याला भेटावा म्हणजे त्याचा आदर्श घेऊन आपल्यालाही त्याच्याप्रमाणे समदृष्टी प्राप्त करून घेता येईल असे वाटते परंतु ते शक्य होत नाही कारण तो त्याला समदृष्टी प्राप्त झाली आहे आणि त्यानुसार तो वागत आहे हे कुणाला सांगत नसल्याने त्याचे व्यवहार इतरांप्रमाणेच चालू असतात. तो सगळ्यांच्याबरोबर मिसळून रहात असतो. त्यामुळे त्याला वेगळे काढता येत नाही. त्यालाही नामरूप असते पण त्याचे मन सर्व ठिकाणी समदृष्टी झालेले असल्याने तो खरोखर ब्रह्मच असतो. त्याचे व्यवहार वरवर जरी दिसायला इतरांप्रमाणे असले तरी त्याच्या मनाची ठेवण मात्र वेगळी असते. वाऱ्याच्या संगतीने पाण्यावर लाटा निर्माण होतात. अज्ञानी लोक त्या पाण्यापेक्षा वेगळ्या समजतात परंतु त्या पाण्यापेक्षा वेगळ्या नसल्याने नंतर त्या पाण्यातच मिसळून जातात, त्याप्रमाणे समदृष्टी असलेला साधक जगापासून वेगळा असेल असे वाटत असते पण तो सगळ्यांच्याबरोबर मिळून मिसळून रहात असतो. श्री एकनाथमहाराजांनी अशी ब्राह्मीस्थिती संसारात राहून अनुभवली होती हे आपल्याला माहित आहेच.

भगवंत पुढील श्लोकात त्याबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, अशा तऱ्हने जो समदृष्टी असतो त्या पुरुषाची लक्षणे मी तुला ते थोडक्यात सांगतो. ज्याला प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद होत नाही किंवा ती मिळाली नाही तरी दु:ख होत नाही. तो स्थिरबुद्धी, मोहरहित, ब्रह्मज्ञ व ब्रह्माचे ठिकाणी स्थित आहे, असे समज.

Advertisement

प्रिय-लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये । बुद्धि निश्चळ निर्मोह ब्रम्ही ज्ञानी स्थिरावला ।। 20 ।।

सर्व विश्वात ब्रह्म ही एकच वस्तू भरून राहिली आहे अशी ज्याची पुरेपूर खात्री असते त्याला जगातली प्रत्येक वस्तू ही ब्रह्मरूपच वाटत असल्याने त्याच्या दृष्टीने ती प्रिय असो वा नसो त्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे जे मिळेल आणि जितक्या प्रमाणात मिळेल तेव्हढ्यावर तो संतुष्ट असतो. समजा आपण घरातील लहान मुलांना घेऊन परगावी रेल्वे किंवा बसने निघालो आहोत तर वाहनात शिरल्या शिरल्या लहान मुले खिडकीची जागा धरायला धावतात. त्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागून भांडणेही होतात आणि ती आपल्याला सोडवावी लागतात. अशावेळी आपण मात्र मिळेल ती जागा स्वीकारून तेथे बसून टाकतो कारण आपल्याला माहित असतं की, बस शेवटी सर्व जागांसह मुक्कामी जाणार आहे. त्यातून मिळालीच खिडकीची जागा तर आपण ती सोडत नाही पण ती हवीच असा आपला अट्टहास नसतो कारण एकदा मुक्कामी पोहोचले की कोठे बसून प्रवास केला ह्याला फारसे महत्त्व रहात नाही.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, स्थिरबुद्धी मनुष्य आयुष्यभर जे मिळेल ते स्वीकारत पुढे जात असतो. जीवनात मिळणाऱ्या किंवा न मिळणाऱ्या गोष्टींना आध्यात्मिकदृष्ट्या काहीच महत्त्व नसल्याने त्या मिळाल्या काय आणि न मिळाल्या काय त्याला सारखेच असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.