आशियात तूर्तास टळले मोठे युद्ध
दोन देशांनी सीमेवरून सैनिकांना परत बोलाविले : थायलंड-कंबोडियाने संघर्ष तूर्त टाळला : तणाव कायम
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आशियात आणखी एका मोठ्या युद्धाची भीती आता दूर झाली आहे. यापूर्वी थायलंड आणि कंबोडिया हे देश सीमेवर मोठ्या संख्येत सैनिक तैनात करत होते. सैन्यस्तरावर चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैन्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान जुना सीमा वाद आहे. या वादामुळे दोन्ही देशांदरम्यान अनेकदा सैन्य संघर्षही झाला आहे. अलिकडेच एका संघर्षात कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला होता. परंतु आता थायलंडसोबत सैन्यस्तरीय चर्चेनंतर कंबोडिया वादग्रस्त सीमा क्षेत्रातून सैनिकांना मागे बोलाविण्यावर सहमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हा संघर्ष कधीही पुन्हा डोकं वर काढू शकण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कायम आहे.
कंबोडियन सैन्याचे डेप्युटी कमांडर आणि तिसऱ्या इंटरवेंशन ब्रिगेडचे कमांडर लेफ्टनंट जनरल स्रे डोएक यांनी वादग्रस्त सीमा मुद्द्यावर बैठकीसाठी सुरनारी टास्क फोर्सचे कमांडर मेजर जनरल सोमपॉप फरावेट यांना आमंत्रित केले होते. कंबोडियन सैनिक चोंग बोक क्षेत्रातून हटतील आणि 2024 मध्ये झालेल्या सहमतीनुसार संबंधित ठिकाणी परततील यावर दोन्ही देश सहमत झाल्याचे माहिती रॉयल थाई आर्मीचे प्रवक्ते मेजर जनरल विन्थाई सुवारी यांनी दिली.
150 मीटर मागे हटणार कंबोडियन सैनिक
कंबोडियन सैनिक विशेष स्वरुपात त्रिमुक पॅवेलियनमध्ये जातील, जे वादग्रस्त क्षेत्रापासून सुमारे 150-200 मीटरच्या अंतरावर आहे, तेथेच हे सैनिक यापूर्वी तैनातहोते. थाई क्षेत्रात 200 मीटरपर्यंत अतिक्रमण केलेल्या ठिकाणावरून हटण्यास कंबोडिया सैन्याने सहमती दर्शविली आहे. या पावलाचा उद्देश तणाव कमी करणे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करणे असल्याचे सुवारी यांनी सांगितले आहे.
साप्ताहिक बैठकांची योजना
दोन्ही देशांच्या सैन्यांनी क्षेत्राचे स्थायी स्वरुपात व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक सीमा समिती व्यवस्थेचा वापर करण्यावर सहमती दर्शविली असून यात संवाद राखण्यासाठी साप्ताहिक बैठकांची योजना आखण्यात आली आहे. हे पाऊल सिनेटचे अध्यक्ष हुन सेन आणि पंतप्रधान हुन मानेट समवेत कंबोडियाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागील टिप्पणींच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले आहे. कंबोडियाचे सैनिक वादग्रस्त क्षेत्रातून हटणार नाहीत, असे कंबोडियन नेत्यांनी म्हटले होते.
दोन्ही देशांमधील वादाची पार्श्वभूमी
वादग्रस्त भूमी थायलंड,लाओस आणि कंबोडियाच्या त्रि-सीमा क्षेत्रात असून त्याला सर्वसाधारणपणे एमराल्ड ट्राएंगल किंवा खमेरमध्ये मोम बेईच्या स्वरुपात ओळखले जाते. हे क्षेत्र 28 मे रोजी झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये फ्लॅशपॉइंटठरले होते, ज्याच्या परिणामादाखल एक कंबोडियन सैनिक मारला गेला होता. ही घटना आकस्मिक होती असे थाई अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
थायलंडचा कंबोडियाला इशारा
कंबोडियाने स्वत:चे सैनिक मागे न घेतल्यास स्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा थायलंडने शनिवारी दिला होता. याकरता थायलंडने 2000 साली झालेल्या कराराचा दाखला दिला होता, ज्यात कुठल्याही देशाला सीमेवरील भूभागाचे स्वरुप एकतर्फी पद्धतीने बदलण्यापासून रोखण्याची तरतूद आहे. संयुक्त सीमा समिती व्यवस्थेचा वापर करण्याचे थायलंडचे आवाहन फेटाळत कंबोडियाच्या सिनेटचे अध्यक्ष हुन सेन यांनी हा वाद निकाली काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे.