For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वैभव’शाली भारताचा जेतेपदाचा ‘षटकार’

06:58 AM Feb 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘वैभव’शाली भारताचा जेतेपदाचा ‘षटकार’
Advertisement

इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा विश्वविजेती : सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने वैभवचा गौरव

Advertisement

वृत्तसंस्था/ हरारे

आयसीसी युवा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी दणदणीत विजय साकारत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी आणि वादळी 175 धावांच्या खेळीमुळे भारताने 412 धावांचा डोंगर उभा केला, ज्यापुढे इंग्लंडचा संघ पुरता कोसळला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश फलंदाज सपशेल अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ 312 धावांत गारद झाला. या विजयासह भारताने सहाव्यांदा (2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026) विश्वविजेतेपदाचा चषक उंचावून नवा इतिहास रचला आहे.

Advertisement

अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ऐतिहासिक 412 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडसाठी बेन डॉकिन्स, बेन मायेस आणि सॅलेब फाल्कोनर यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरूवातीला मोठा धक्का बसला. सलामीवीर जोसेफ मुरेस अवघ्या 17 धावा करून माघारी परतला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेयसने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. डॉकिन्सने 66 धावा केल्या. तर मेयसने 45 धावांचे योगदान दिले, पण हे दोघेही मोक्याच्या क्षणी बाद झाले. कर्णधार थॉमसला केवळ 31 धावा करता आल्या. यानंतर कॅलेब फॉकनरने 67 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारासह 115 धावांची खेळी साकारली. शेवटी कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने महत्वपूर्ण खेळी केली. पण तो देखील संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे इंग्लंडचा डाव 40.2 षटकांत 311 धावांत आटोपला. भारताकडून अंबरिशने 3 तर दीपेश देवर्धनने 2 बळी घेतले.

वैभवचा पुन्हा एकदा धमाका

तत्पूर्वी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आयुष म्हात्रेचा हा निर्णय वैभव सूर्यवंशीने सार्थ ठरवला. भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज यांनी केली. मात्र सुरुवातीलाच अॅरॉन जॉर्ज अवघ्या 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर वैभव आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी 142 धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. आयुषने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. यानंतर मात्र वैभवने अक्षरश: इंग्लिश गोलंदाजांची झोप उडवली. त्याने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 55 चेंडूत शतक झळकावले. वैभवने फक्त 71 चेंडूत 150 धावांचा टप्पा ओलांडत प्रेक्षकांना थक्क केले. अखेर त्याने 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची अफलातून खेळी केली. या डावात त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 218.75 इतका होता.

वैभव बाद झाल्यानंतर विहान मल्होत्राने 36 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावा करत योगदान दिले. वेदांत त्रिवेदीनेही 36 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावांची उपयुक्त खेळी केली. अभिज्ञान कुंडूने आक्रमक खेळ करत 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत 9 गडी गमावत 411 धावांचा डोंगर उभा केला.

संक्षिप्त धावफलक

भारत 50 षटकांत 9 बाद 411 (वैभव सूर्यवंशी 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175, आयुष म्हात्रे 53, कुंडू 40, जेम्स मिंटो 3 बळी, एलेक्स ग्रीन आणि मॉर्गन प्रत्येकी 2 बळी)

इंग्लंड 40.2 षटकांत सर्वबाद 311 (कॅलेब फॉकनर 115, मेयस 45, डॉकिन्स 66, अंबरिश 3 बळी, देवेंद्रन 2 बळी).

वैभव सूर्यवंशीचे वर्ल्ड रेकॉर्ड

इंग्लंडविरूद्ध फायनलमध्ये वैभवने 55 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. हे या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतकी खेळी करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या विल मालायचुकच्या नावावर आहे. त्याने या वर्ल्डकप स्पर्धेत जपानविरूद्ध झालेल्या सामन्यात 51 चेंडूत वेगवान शतक झळकावले होते. तर वैभव सूर्यवंशीने 55 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.

अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज

51 चेंडू - विल मालायचुक (ऑस्ट्रेलिया) वि जपान, विंडहोक, 2026

55 चेंडू - वैभव सूर्यवंशी (भारत) वि इंग्लंड, हरारे, 2026

63 चेंडू - कासिम अक्रम (पाकिस्तान) वि श्रीलंका, नॉर्थ साउंड, 2022

65 चेंडू - बेन मेयस (इंग्लंड) वि स्कॉटलंड, हरारे, 2026

टीम इंडियाचे सहावे जेतेपद

भारतीय संघाने सर्वाधिक वेळा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा स्वत:चा विक्रम सुधारला आहे. भारत आता सहाव्यांदा विजेता बनला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी चार वेळा 19 वर्षांखालील विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विश्वचषक जिंकला होता. आता 2026 मध्ये हे सहावे जेतेपद पटकावून भारताने अंडर-19 क्रिकेटमधील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

Advertisement
Tags :

.