For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panhala Leopard | पन्हाळ्याच्या साहेबांचे' पुन्हा दर्शन; लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर राजेशाही थाटात विसावला बिबट्या

01:37 PM Sep 02, 2026 IST | NEETA POTDAR
panhala leopard   पन्हाळ्याच्या साहेबांचे  पुन्हा दर्शन  लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर राजेशाही थाटात विसावला बिबट्या
Advertisement

पन्हाळा -पन्हाळ्यातील पावनगड रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या निवांतपणे बसलेला दिसून आल्याने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. श्रावणातील हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात जणू हा बिबट्या रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी बिबट्याला पाहण्याचे कुतूहलही तितकेच वाढले आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून ठराविक कालावधीनंतर पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे दर्शन घडणे ही जणू नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे या वन्य पाहुण्याने पन्हाळ्यालाच आपले कायमस्वरूपी निवासस्थान बनवल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र, बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.

यावेळी बिबट्या लता मंगेशकर बंगल्याच्या कठड्यावर अगदी राजेशाही थाटात बसलेला दिसून आला. त्याचा फोटो सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅप स्टेटसवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. "पन्हाळ्याच्या साहेबांनी पुन्हा दर्शन दिले," असे संदेश सर्वत्र फिरू लागले. त्यामुळे बिबट्या आणि पन्हाळकर यांच्यात एक वेगळेच भावनिक नाते निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement

ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळ आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्याची ओळख आता बिबट्याच्या उपस्थितीमुळेही अधिक ठळक होत आहे. लता मंगेशकर बंगला, रेडेघाट आणि पावनगड परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने हा भाग बिबट्याचे सुरक्षित अधिवासस्थान बनल्याचे दिसून येते. बिबट्याचे दर्शन घडावे या उत्सुकतेपोटी अनेक नागरिक आणि पर्यटक या परिसरात येत असतात. मात्र, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेता कोणत्याही प्रकारची बेफिकिरी न करता सुरक्षित अंतर राखणे आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात एक-दोन नव्हे तर दोन ते चार बिबट्याची पिल्ले आणि दोन ते तीन पूर्ण वाढ झालेले बिबटे वावरत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.