For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिबट्या कुत्र्याच्या शिकारीसाठी आला अन् पिंजऱ्यात अडकला

08:08 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिबट्या कुत्र्याच्या शिकारीसाठी आला अन् पिंजऱ्यात अडकला
Advertisement

सुतगट्टी परिसरातील नागरिकांनी सोडला नि:श्वास : बिबट्या पकडण्यात वनखात्याला यश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

परशानट्टी आणि सुतगट्टी परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनखात्याला बुधवारी यश आले. सुतगट्टी जंगल भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या सापळ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून सदर बिबट्याला काकती येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे.

काकती वनखात्याच्या हद्दीत येणाऱ्या परशानट्टी, सुतगट्टी, शिवापूर, निंग्यानट्टी, घुरामट्टी, कुरिहाळ, कट्टणभावी यासह परिसरातील गावांमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बिबट्याची दहशत होती. सुतगट्टी जंगल परिसरात बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत होते. बिबट्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यामुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ऐन खरीप हंगामात बिबट्या आल्याने शेतकऱ्यांना शेताकडे जाणेही कठीण झाले होते. बिबट्यापासून सावध रहावे, अशी दवंडीदेखील गावागावांमध्ये देण्यात येत होती. बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागल्याने वनखात्याच्यावतीने सुतगट्टी जंगल परिसरात एक पिंजरा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये दुसऱ्या कप्प्यात कुत्रा बांधण्यात आला होता. बिबट्याचे आवडते भक्ष्य कुत्रा असल्याने त्याची शिकार करण्यासाठी बिबट्या नक्की त्या ठिकाणी येईल, अशी खात्री वनखात्याला होती. त्यानुसार पिंजरा ठेवून बिबट्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

सदर पिंजऱ्यातील कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या पिंजऱ्यात शिरताच दरवाजा खाली पडला. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती समजताच वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. बिबट्याचा व्हिडिओ टिपण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले होते. सदर बिबट्याला सध्या काकती येथील वन्यजीव बचाव केंद्रात हलविण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला कोणत्या ठिकाणी सोडावे, हे निश्चित केले जाणार आहे. अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यात यश

सुतगट्टी आणि परिसरात अधूनमधून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत होते. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत त्या परिसरात एक पिंजरा ठेवण्यात आला होता. पिंजऱ्यातील एका कप्प्यात कुत्र्याला ठेवले होते. कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केल्याने त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

- बी. एल. सनदी, वनक्षेत्रपाल, काकती

Advertisement
Tags :

.