80 वर्षे अखंड परंपरेचा वारसा
अर्जुनवाडा गावात ‘एक गाव एक गणपती’
तुरंबे / श्रीकांत जाधव :
राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा हे गाव गेली तब्बल 80 वर्षे ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा जोपासत आहे. 1945 साली पैलवान दादा यादव, दादू चौगुले, बापूसो पाटील, पांडुरंग गुरव, भाऊसो यादव, बापूसो बरगे या ज्येष्ठ मंडळींनी गावातील एकी टिकावी, शांतता नांदावी आणि संपूर्ण गाव संघटित व्हावे, या उदात्त हेतूने या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामस्थांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आजही ती अखंडपणे सुरू आहे.
तहसीलदार अनिता देशमुख, माजी उपसभापती अरुण जाधव, मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी अर्जुनवाडा गावाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

गणेशोत्सव म्हटला की ढोल-ताशांचा गजर, डीजेचा कर्कश्य आवाज, लेसर लाईट्सचा झगमगाट असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. पण राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावाने गेल्या 80 वर्षापासून या सगळ्या आधुनिक चकाकटीला दूर ठेवत ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा जपली आहे. या गावांनी लोकमान्य टिळकांच्या उद्देशाला साजेशा पद्धतीने पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून दिला आहे. अर्जुनवाडा हे सुमारे 3 हजार लोकसंख्येचे गाव असूनही गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टिम, लेसर शो यासारख्या ध्वनी प्रदुषण करणाऱ्या गोष्टींना येथे स्थान नाही. उलट संपूर्ण वारकरी मंडळी गणपती आगमन मिरवणुकीत सहभागी होतात. टाळ मृदंगाच्या गजरात गणपतीचे आगमन बुधवारी गावात झाले. येथील हनुमान तालमीत विधिवत पूजा केली. तर विसर्जनापर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. यामध्ये तरुणांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम, महिलांसाठी व्याख्याने, वकृत्व स्पर्धा, प्रवचन, भजन, तरुणांची पदनाट्यो, मर्दानी खेळ, झांज पथक, महिलांची झिम्मा-फुगडी अशा विविध उपक्रमांमुळे गावात मंगलमय वातावरणाची निर्मिती होते.
हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नामदेव चौगुले, शुभम पाटील, सचिन पाटील, शिवाजी चौगुले, ओमकार पाटील, पार्थ चौगुले, संग्राम पाटील, अनिकेत पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ, महिला मंडळी आणि तरुण कार्यकर्ते या उत्सवात सहभागी होतात. अर्जुनवाडा गावाने दिलेला हा आदर्श इतर गावांनी अंगीकारला, तर निश्चितच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा खरा उद्देश यशस्वी ठरेल. गावे अधिक एकत्र येतील आणि सुजलाम-सुफलाम होतील.
- अडीच फूट उंचीची शाडूची मूर्ती
विशेष बाब म्हणजे, गेल्या 80 वर्षांपासून फक्त अडीच फूट उंचीची शाडूची मूर्तीच पूजली जाते. विसर्जन मिरवणुकीत कोणताही गोंगाट न करता पारंपरिक कलांना प्राधान्य दिले जाते. मूर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी नदीपात्र प्रदूषित न करता गावाच्या बाहेरील खड्ड्यातच व्यवस्था केली जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नामदेव चौगुले यांनी सांगितले.
अर्जुनवाडा या गावाने जो आदर्श घालून दिला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. इतर गावांनी देखील ही परंपरा अंगीकारली, तर संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सव शांततेत, प्रदूषणमुक्त आणि ऐक्याच्या वातावरणात साजरा होईल.
- अनिता देशमुख, तहसीलदार