विकासाचा ध्यास घेतलेला नेता : आमदार हलगेकर
खासदार विश्वेश्वर हेगडे यांचे आमदार विठ्ठल हलगेकरांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिपादन : विविध क्षेत्रातील मान्यवरांची आवर्जून उपस्थिती
खानापूर : आमदार विठ्ठल हलगेकर यांचा वाढदिवस तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेकरिता उत्सव आहे. या उत्सवात सर्वसामान्यांचा विचार करून आरोग्य, कृषी व शासकीय योजनांचे प्रदर्शन करून वाढदिवस साजरा करणे वेगळेच आहे. यामुळे उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला नेता म्हणजे आमदार विठ्ठल हलगेकर आहेत. त्यांच्या सहकार्यातून तालुक्यातील सामान्य जनतेच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मीसुद्धा खासदार या नात्याने प्रयत्न करेन, असे उद्गार मंगळवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले.
सुरुवातीला प्रमोद कोचेरी यांनी उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांकडून आमदार विठ्ठल हलगेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरु, तोपिनकट्टी व हंडीभडंगनाथ येथील मठातील महाराजांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या हस्ते करण्यात आले.
विधानपरिषदेचे हणमंत निराणी म्हणाले की, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपला वाढदिवस वेगळा विचार करून साजरा केला आहे. ग्रामीण भागातील मुलांना एलकेजी ते पदवीपर्यंत शिक्षण देण्याचे काम, शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना व युवकांना उद्योगधंदा देण्याचे काम त्यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार संजय पाटील, सुभाष पाटील यासह अनेकांची आमदार विठ्ठल हलगेकर यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. यावेळी बसवराज सानिकोप, धनश्री सरदेसाई, सुरेश देसाई, बाबुराव देसाई, मुरुगेशगौडा पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, सुनील मडी, श्रीकांत इटगी, सदानंद पाटील, शंकर पाटील, पंडित ओगले, प्रकाश तिरवीर, अशोक देसाई, भरमाणी पाटील, दिगंबर बेळगावकर यासह भाजप नेते, कार्यकर्ते, शेतकरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरोदर महिला-लहान मुलांनी कापला केक
पोषण अभियानांतर्गत गरोदर महिलांना शाल अर्पण करून व त्यांची ओटी भरून सत्कार करण्यात आला. लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे म्हणाले, कर्नाटक राज्यामध्ये बाळंतिणींना सध्या विचित्र अवस्थेतून जावे लागत आहे. मात्र, आमदार हलगेकर यांनी गरोदर महिलांना धीर देण्यासाठी अशा प्रकारचे आयोजन केले, हे कौतुकास्पद आहे.