Karad news | उकाड्याने हैराण कराडकरांची पावले प्रीतिसंगमाकडे; सायंकाळच्या वेळी मोकळ्या हवेसाठी नागरिकांची मोठी गर्दी
उकाड्याने हैराण कराडकरांना प्रीतिसंगम बागेचा आधार
कराड: उकाड्याने हैराण झालेले कराडकर नागरिक सायंकाळच्या वेळी प्रीतिसंगम बागेतील मोकळ्या हवेचा आंनद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. तर सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने बागेतील खेळण्यांवर चिमुकल्यांची गर्दी होत आहे. संध्याकाळच्यावेळी बाग, कृष्णा घाट व वाळवंट गर्दीने गजबजून जात आहे.
जवळपास पंधरादिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंशावर जात असल्याने कराडचे वातावरण चांगलेच तापले आहे. परिणामी दिवसभर शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. संध्याकाळीसाडेपाचनंतर मात्र बाजारपेठ व शहरातील रस्त्यावर गर्दी जाणवत आहे.
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची पावले संध्याकाळच्यावेळी मोकळया हवेसाठी प्रीतिसंगम बागेकडे बळत आहेत. त्यातच सध्या शाळांना सुट्या असल्याने शाळांना उन्हाळी सुट्टया असल्याने प्रीतिसंगम बागेतील खेळण्यांवर चिमुकल्यांची गर्दी होत आहे.
शहरासह तालुक्यातील नागरिक चिमुकल्यांसह बागेत येत आहेत. चिमुकल्यांकडून बागेतील खेळण्यांचा आनंद लुटला जात आहे. बागेतील गवताच्या थंडगार गालिचावर महिला व नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बागेतील झाडी तसेच कृष्णा-कोयना नदीचा संगम यामुळे बागेत थंडगार हवेची अनुभूती येत असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. प्रीतिसंगमाच्या वाळवंटातही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या टेंभू प्रकल्पात पाणी आडवल्यामुळे नागरिक व चिमुकले नदीतील पाण्यात खेळयाचा व बोटींगचाही आनंद लुटत आहेत.