कर्मयोगी केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करत असतो
अध्याय पाचवा
भगवंत म्हणाले, कर्मयोग अंगात भिनलेल्या साधकाने मन आणि बुद्धी सद्गुरुना अर्पण केलेली असल्याने त्याचा मी कर्ता आहे हा भाव पूर्णपणे मावळलेला असतो. त्याचे निर्विकार मन सद्गुरूंच्या उपदेशाने भारून गेल्याने आत्मस्वरूपमय झालेले असते. त्याने काही कार्य केले तरी ते त्याने केले असे त्याला वाटत नाही. पुढे भगवंत सांगतात, त्याची इंद्रिये श्वास घेणे, खाणे, पिणे, बघणे, वास घेणे, झोपणे इत्यादि नैसर्गिक कामे करत असली तरी तो स्वत:ला कर्ता मुळीच समजत नाही. आत्मज्ञानी साधकाला सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार चालू आहे ह्याची खात्री असते. सामान्य माणसे स्वत:ला कर्ता समजत असल्याने ती मात्र झोपेत राहून कर्तृत्व गाजवण्याची स्वप्ने पहात असतात. त्यांच्या इच्छा त्यांना स्वप्नातही छळत असतात. त्यामुळे त्याला स्वप्नेही वासनेची आणि तिच्या तृप्तीचीच पडतात. जेव्हा तो निरिच्छ होतो तेव्हा त्याला सुखाची झोप लागलेली असते.
आपल्याला जेव्हा एखाद्यावेळी अशी सुखाची झोप लागते त्यावेळी जागे झाल्यावर आपण अगदी प्रसन्न असतो. काय मस्त झोप लागलेली होती असे आपण म्हणतो. आत्मज्ञानी साधकाला रोजच अशी सुखाची झोप लागत असते कारण त्याला सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार चालू आहे ह्याची खात्री असल्याने त्यात आपल्या इच्छेचा कोलदांडा घालून आपले मन:स्वास्थ्य कशाला बिघडवून घ्या असा विचार त्यामागे असतो. अगदी लहान मुलाच्या मनातही कोणत्याच इच्छा उपजत नसल्यामुळे त्या तृप्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने त्यालाही शांत झोप लागते. ह्या सगळ्यावरून निरिच्छ होणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या ध्यानात येते.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, असा कर्मयोगी केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करत असल्याने कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते, तसा तो पापापासून अलिप्त असतो.
ब्रम्ही ठेऊनिया कर्मे संग सोडूनि जो करी । पापे न लिप्त तो होय पद्म-पत्र जसे जळे ।। 10 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या आश्रयाने कर्मयोगी सर्व कर्मे करत असतो. कोणतेही काम केले तरी स्वत:ला तो कर्ता समजत नाही तसेच त्याला कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते. त्यामुळे त्याला कर्मबंधन लागू होत नाही. मग ते कर्म जगाच्या दृष्टीने चांगले असो वा वाईट.
एक उदाहरण पाहू. ज्या घराण्यात मनुष्य जन्माला येतो त्यानुसार त्याला कर्मे करावी लागतात. काहीवेळा ती निषिद्ध कर्मे सुद्धा असतात. सज्जन नावाचा एक कसाई होता. जनावरांना मारून त्यांचे मांस विकण्याचा त्याचा पिढीजात व्यवसाय होता. इतरांच्या दृष्टीने हे काम निषिद्ध होते परंतु ईश्वरी इच्छेनुसार ते त्याच्या वाटणीला आले होते आणि ते तो प्रामाणिकपणे करत होता. काम करत असताना तो विठोबाचे नाम घेत असे.
नाम घेत केलेले कर्म निषिद्ध असले तरी तो करत असलेल्या कर्माचे पाप त्याला लागत नसे. एव्हढेच नव्हे तो प्रेमाने नाम घेत आहे हे पाहून विठोबाही त्याच्या बरोबर तेथे हजर राहून त्याला मदत करत असे. ईश्वराच्या दृष्टीने उच्च नीच असा भेदभाव कधीच नसतो. ह्यावरून कुणी असं म्हणतील की, नाम घेत राहून आम्ही दुष्कृत्ये केली तर त्याचे पाप आम्हाला लागणार नाही. तात्विकदृष्ट्या त्यांचे म्हणणे जरी बरोबर वाटत असले तरी ज्याची स्वत:हून दुष्कृत्ये करायची इच्छा असते त्याला ते करत असताना देवाची आठवण होत नाही आणि यदाकदाचित जर झालीच तर देव त्याला दुष्कृत्य करण्यापासून थांबवतो.
क्रमश: