नववर्ष 2026 चे जल्लोषात स्वागत
समुद्रकिनारे गजबजले पर्यटकांच्या गर्दीने : गोमंतकीयांसाठी ठरणार निवडणुकांचे वर्ष
पणजी : गोव्यात सर्वत्र नववर्षाचे थाटात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात प्रचंड प्रमाणात देशी विदेशी पर्यटक आले असून अनेक पर्यटकांना हॉटेल्स फुल्ल असल्यामुळे आसरा मिळू शकला नाही. त्यामुळे अनेकाने मिरामार समुद्रकिन्रायाचा उपयोग केला. रात्री उशिरापर्यंत सर्वत्र कार्यक्रमांची धमाल चालू होती. अकरा वाजून 59 मिनिटांनी आयोजकांनी अंधार केला आणि अवघ्या 55 सेकंदांनंतर दिवे चालू करण्यात आले आणि नूतन वर्षाचे हर्ष उल्हासात स्वागत करण्यात आले. गोव्यासाठी यंदाचे हे वर्ष निवडणूक वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. या वर्षाअखेर गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार होणार असून त्यासाठीची रस्सीखेच सुरू होईल.
राज्यातील जनतेने मध्यरात्री बारा वाजता साल 2026 चे थाटात स्वागत केले. राजधानी पणजीमध्ये सर्व रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पर्यटकांचे थवेच्या थवे कॅसिनो तसेच बोटीच्या दिशेने जात होते. पणजीत चर्च चौकामध्ये पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. तसेच विविध ठिकाणी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी नृत्य रजनीचे आयोजन केले होते. पर्यटकांसह गोव्यातीलही नागरिकांनी या सहभागी होण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक आले आहेत. विदेशी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवरील तारांकित हॉटेलमध्ये राहणे पसंत केले. उत्तर गोव्यात कांदोळी, सिकेरी, कळंगुट, बागा, हणजुणे, वागातोर तसेच शिवोली मोरजी, मांद्रे, हरमल येथील किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी हॉटेल चालकांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि संगीताच्या तालावर बेधुंदपणे अनेकांनी नृत्य सादर केले.
चर्चमध्ये विशेष प्रार्थना
नूतन वर्षाचे स्वागत गोव्यातील अनेक भागांमध्ये करण्यात आले. बारा वाजता दारू कामाची आतषबाजी देखील करण्यात आली. राज्यातील चर्चमध्ये यानिमित्त विशेष प्रार्थना घेण्यात आल्या. फादर्सनी रात्री बारा वाजता इसवी सन 2026 सुरू झाले असे जाहीर केले आणि त्यानंतर चर्चवरील घंटांचा नाद सुरू झाला.
निवडणूक वर्ष 2026
गोव्यात फेब्रुवारी 2027 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी यावर्षी होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकार तसेच विरोधी पक्षांची आगामी निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी दिसून येणार आहे. त्यामुळेच हे वर्ष निवडणुकीचे असे मानले जाईल. आतापासून आगामी निवडणुकीसाठीची धोरणे सत्ताधारी पक्ष राबवायला सुऊवात करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही विशिष्ट तरतुदी केल्या जाणार आहेत. वर्षभरात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अनेक महत्त्वाच्या घोषणा करून मतदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतील. अनेक राजकीय नेते आयाराम गयाराम करतील. त्यामुळे वर्षभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडायच्या आहेत.
मनपा, पालिकांच्या निवडणुका
लवकरच पणजी महापालिकेची निवडणूक होईल. त्यानंतर गोव्यातील 11 पालिकांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होतील. त्याचबरोबर फोंडा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक देखील होणार आहे. या निवडणुका झाल्यानंतर लागलीच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्व शक्तीनिशी सत्ताधारी पक्षाला करावी लागणार आहे. एकंदरीत वर्षभरात भाजपच्या त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सभा देखील गोव्यात होतील. त्यामुळे एकंदरीत यंदाचे हे वर्ष निवडणूक वर्ष राहील.