विजापूर जिल्ह्यातील सायकलस्वाराचा दोनशे कि.मी.चा प्रवास
आंदोलनस्थळी वेधले साऱ्यांचे लक्ष : मांडल्या समस्या
बेळगाव : हलगा येथील विधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे परिसरात आंदोलनकर्ते दाखल होऊ लागले आहेत. गुरुवारी चडचण तालुक्यातील एका आंदोलनकर्त्याने चक्क सायकलने 200 किलोमीटरचा प्रवास करत विधानसौध गाठले. आपल्या मागणीसाठी सायकलवरून मोठा प्रवास केला आहे. चडचण जि. विजापूर या ठिकाणी बदलत्या हवामानामुळे द्राक्षे, डाळिंब आणि ऊस पिकाला फटका बसला आहे. त्याबरोबर सिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे. मात्र, हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. प्रकल्पासाठी जागा गेली आहे. मात्र, अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही या आंदोलनकर्त्याने यावेळी केली. विधानसौध परिसरातील आंदोलनस्थळावर राज्यातील विविध ठिकाणाहून विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्ते विविध वाहनांमधून दाखल होत आहेत. मात्र, विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील एका आंदोलनकर्त्याने सायकलवरून दाखल होऊन साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आपल्या समस्या सांगून तातडीने शासनाने त्या पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षाही केली आहे.