For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागृतीची वारी

06:42 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागृतीची वारी
Advertisement

आषाढीची वारी । आहे माझे घरी । आणिक न करी । तीर्थव्रत ।। असा भाव मनी बाळगत दरवर्षी लाखो वारकरी आषाढीची वारी करतात. यंदाही विठुनामाच्या घोषात  वैष्णवांचा महामेळा पंढरपूरात एकवटला आहे. आपली ही चैतन्यवारी आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या चरणी अर्पण करतील. जगातला हा अनुपम्य सुखसोहळाच म्हटला पाहिजे.

Advertisement

‘देशाला भूगोल, पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे,’ असे आचार्य अत्रे म्हणत असत. महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा, पराक्रमाचा आणि लढाऊपणाचा बाणा पाहता अत्रे यांचे हे विधान यथार्थच म्हणावे लागेल. मराठी संस्कृतीचा विचार करता संत विचार हा महाराष्ट्राचा मूलाधारच म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘भावार्थ दीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ प्राकृतमधून लिहून खऱ्या अर्थाने ती सर्वसामान्यांकरिता खुली झाली. जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगगाथेने भक्तीसोबत जगण्याचे वास्तव मांडले. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।। हा रंजल्यांगांजल्याप्रतीचा दृष्टीकोन असो वा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। हा सर्वव्यापी संदेश असो. तुकोबारायांच्या अभंगातून समत्वाच्या दिंडीचा आवाजच सदैव गुंजत राहिला. नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।। असे म्हणत नामदेवांनी भागवत धर्माची पताका सर्वदूर फडकवत ठेवली. याशिवाय संत सावता महाराज, संत चोखा मेळा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांसह अन्य संतांनीही सर्वसमावेशकतेचा विचार जनमानसात रुजवला. त्यातूनच आज वारीला इतके व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते. वास्तविक, वारीचा उगम नेमका कधी व केव्हा झाला, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. तथापि, संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांनी सर्वप्रथम वारीला सोहळ्याचे रूप दिले. तर पुढे हैबतबाबांनी वारीच्या या सोहळ्याला अधिक नियोजनबद्ध आकार दिला. मागच्या शेकडो वर्षांपासून वारीचा हा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. यंदाही अलंकापुरीतून ज्ञानदेवांची, तर देहूतून तुकोबारायांची, तर अन्य ठिकाणाहून इतर संतांच्या पालख्या पंढरपूरात पोहोचल्या आहेत. हा संतभार भूवैकुंठी दाखल झाल्याने पंढरपूरात भक्तीचा महापूरच लोटल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. पंढरीचा वास । चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन । विठोबाचे ।। हा वारकऱ्यांचा नित्यनेम. एकादशीला हा अमृतानुभव घेऊन सारा आसमंत विठ्ठलमय होईल, हे वेगळे सांगावयास नको. या विठुरायाचे वर्णन तरी किती आणि कुठल्या शब्दांत करायचे? तुकोबाराय ‘सुंदर ते ध्यान’च्या माध्यमातून शब्द सुमनांतून हा अभंगरूपी हार ओवतात. लोकदैवत, कानडा विठ्ठल म्हणूनही या दैवताकडे पाहिले जाते. या पलीकडे ‘विठ्ठल एक महासमन्वय’ असल्याची प्रचितीही वारंवार येते. अशा सर्वांच्या लाडक्या विठुरायाला साकडे घालण्याचीही परंपरा आहे. यंदा हवामानात एल निनो हा घटक प्रभावी असल्याने दुष्काळाचे मळभ दाटणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. प्रत्यक्षात आत्तापर्यंतच्या पावसाचा आढावा घेतला, तर पावसाचे प्रमाण हे असमान दिसत आहे. काही भागात धरणे काठोकाठ भरली आहेत. तर काही जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस ताण देईल, असाही अदमास आहे. तसे झाले, तर शेती व शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे राज्यात तसेच इतरत्र सर्वदूर चांगला पाऊस व्हावा व शेतीची भरभराट व्हावी, ही विठुरायाकडे प्रार्थना असेल. याखेरीज चुकीची धोरणे, त्यातून गडद झालेले आर्थिक संकट, महागाई, लोकशाहीचे अवमूल्यन, पेपरफुटी यामुळे सध्या समाजमन अस्वस्थ आहे. या मुद्द्यावर दिल्लीत जंतरमंतरवर देशातील हजारो जागरूक विद्यार्थी एकवटले आहेत. शिक्षणपद्धतीत सुधारणा व्हावी, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या आहेत. या मागण्यांसाठी शुक्रवारी देशभर निदर्शने करण्यात आली. सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियले नाही ।। बहुमता ।। असे तुकोबाराय म्हणतात. त्यामुळे सत्यासाठी लढणे रास्तच. वास्तविक केंद्रातील सरकार आध्यात्मिक बैठक असलेले. रामनामाचा सतत जप करणारे. पण जपतपाइतकेच कर्तव्य महत्त्वाचे होय. ते पार पाडण्याची सद्बुद्धी विठुरायाने सत्ताधाऱ्यांना द्यावी, हेच साकडे आज घालुया.

Advertisement

Advertisement
Tags :

.