किल्ले सिंधुदुर्गजवळ आढळला भलामोठा शार्क माशाचा सांगाडा
मालवण/प्रतिनिधी
येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आज सकाळी एक भलामोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकलेला आढळून आला आहे. मात्र, सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे संबंधित यंत्रणांना या सांगाड्यापर्यंत पोहोचणे आणि त्याची विल्हेवाट लावणे कठीण बनले आहे.समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्रीही जोरदार पाऊस झाला. समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्रीच्या सुमारास हा भलामोठा शार्क मासा वाहून आला आणि किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात अडकला.आज सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासी आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांना हा माशाचा सांगाडा सर्वप्रथम दिसून आला. हा मासा सुमारे १५ ते १७ फूट लांबीचा आहे. तो पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आहे. माशाचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही, तर अन्य भागाचा सांगाडा आणि मांस असल्याचे दिसून येत आहे असे त्यांनी सांगितले.सध्या समुद्र प्रचंड खवळलेला असल्याने या माशाच्या सांगाड्याची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणांना घटनास्थळी पोचणे अत्यंत कठीण झाले आहे. समुद्राला पुन्हा उधाण आल्यास हा सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यता श्री. सावंत यांनी व्यक्त केली आहे.