इस्लामपुरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ
इस्लामपूर :
शहरात बुधवारी सायंकाळ नंतर पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. जवळपास २० हून अधिक लोकांचा व जनावरांचा त्याने चावा घेतला. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण आहे. नगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यानंतर खडबडून जागे होवून या कुत्र्याची पकड मोहिम राबवली. चार कुत्री पकडून पालिकेच्या कचरा डेपोवर ठेवली आहेत.
सायंकाळ नंतर मोमीन मोहल्ला परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी एकाचा चावा घेतला. त्यानंतर त्याने शहरातील अन्य भागाकडे मोर्चा वळवला. लाल चौक, गांधी चौक, यल्लामा चौक, मटण मार्केट, उरुण परिसरात लोकांच्या अंगावर धावून जात या कुत्र्याने हल्ला चढवला. यामध्ये २० हून अधिक लोकांचा त्याने चावा घेतल्याचे समजते. त्यातील ११ जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये चार व आठ वर्षाची दोन मुले, एक महिला, आठ पुरुषांचा समावेश आहे.
रात्री उशिरापर्यंत हे कुत्रे सापडले नव्हते. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वाढल्या आहेत. बाहेरुन आणून इस्लामपूर हद्दीत कुत्री सोडण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरासह उपनगरात कुत्र्यांच्या टोळ्या वाढल्या आहेत. शहरातील एका महिला कॉलेजच्या परिसरात कुत्र्यांच्या टोळ्या आहेत. काही विद्यार्थीनींवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. नगरपालिका प्रशासन शहरातील आरोग्य व स्वच्छतेसह अन्य कामकाजाच्या बाबतीत सुस्त आहे. भटकी कुत्री पकडण्याची मोहिम थंड आहे. त्यामुळे वारंवार नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.