भूकंप होताच वर उचलले जाणार घर
जपानकडून ‘एअर डानशिन’ तंत्रज्ञान विकसित
जपानमध्ये भूकंप होणे सामान्य असून तेथे मोठ्यातील मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांना झेलू शकता येईल अशा तंत्रज्ञानावर काम होत राहते. याच अंतर्गत एअर डानशिन सिस्टीम्स इंक नावाच्या जपानी कंपनीने एक तंत्रज्ञान विकसित केले असून याचे नाव एअर डानशिन ठेवण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान भूकंपावेळी घरांना वर उचलते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने घरांना भूकंपाचे धक्के शांत होत नाही तोवर वर उचलून ठेवता येते. यामुळे जीवित तसेच आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात कमी करता येणार आहे.
कशाप्रकारे काम करते तंत्रज्ञान
घरांना भूकंपापासून वाचविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत घरांखाली एक खास एअर चेम्बर तयार केला जातो, हा एअर चेम्बर तोपर्यंत बंद राहतो, जोपर्यंत भूकंप येत नाही, परंतु सेंसरने भूकंपाच्या धक्क्यांना टिपताच कंप्रेस्ड हवेला चेम्बरमध्ये सोडण्यात येते, यामुळे घर जमिनीपासून 3 सेंटीमीटरपर्यंत वर उचलले जाते. जमिनीपासून इतकी उंची घराला भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांपासून वाचविण्यासाठी पुरेशी असते. भूकंप संपुष्टात येताच सिस्टीम घराला स्वत:च्या जागी सुरक्षित पद्धतीने खाली उतरविते.
किती खर्च?
हे तंत्रज्ञान कागदांपुरती मर्यादित नाही, तर जपानच्या 90 घरांमध्ये याचा वापर होत आहे. भूकंपाचा शोध लागताच ही सिस्टीम केवळ 0.5 ते 1 सेकंदाच्या आत स्वत:चे काम सुरू करते. याचबरोबर एक इमर्जन्सी बॅटरी बॅकअपही लावला जातो, जेणेकरून वीजपुरवठा ठप्प झाल्यास ही प्रणाली काम करत राहिल. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्या म्हणजे भूकंपापासून बचावाच्या पारंपरिक सिस्टीमच्या तुलनेत याची किंमत एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. फॅक्ट्री आणि संशोधन केंद्रांसाठी देखील याचे मोठे वर्जन तयार करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष चाचणी
या तंत्रज्ञानाला सादर करणाऱ्या कंपनीने याची एक प्रत्यक्ष चाचणी देखील केली आहे. याकरता एक पूर्णपणे तयार घरात काचेचे ग्लास आणि फर्निचर ठेवण्यात आले आणि यानंतर घराला नकली भूकंपाचा सामना करावा लागला. भूकंप सुरू होताच घर वर उचलले गेले आणि घरातील एकही काचेची वस्तू तुटली नाही. अत्यंत मोठ्या आणि सर्व बाजूने येणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये हे तंत्रज्ञान किती यशस्वी ठरेल यावर तज्ञ सध्या संशोधन करत आहेत.