ओलमणी येथे भरदिवसा घरफोडी
रोख एक लाख रुपयांसह पाच तोळे सोने लंपास
जांबोटी/ वार्ताहर
खानापूर तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी दुपारी ओलमणी येथील बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख पाच हजार रुपये रोख तसेच पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. ओलमणी येथील रहिवासी चंद्रकांत गोविंद राऊत यांचे दत्त मंदिरानजीक भरवस्तीत घर आहे. सध्या या परिसरात सुगीचा हंगाम सुरू असल्यामुळे चंद्रकांत राऊत हे पती-पत्नी दोघेही भातकापणी करण्यासाठी शेताकडे गेले होते. तसेच त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे बेळगाव येथे कामाला गेला होता. घरात कोणी नसल्यामुळे त्यांनी दरवाजाला कुलूप लावला होता. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केली आहे. प्रारंभी चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा फावड्याने फोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे त्यांनी जिन्याजवळ असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चंद्रकांत राऊत यांनी सोने खरेदी करण्यासाठी घरात ठेवलेली एक लाख पाच हजार रुपये रोख रक्कम, तसेच साडेतीन तोळ्dयांचे गंठण, अर्धा तोळ्dयाची बोरमाळ, कानातील झुबे व कर्णफुले, दोन अंगठ्या असा एकूण पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवज लंपास केला आहे.
ही घटना बुधवारी दुपारी 1 ते 2.30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. घरफोडीच्या घटनेनंतर तीन वाजण्याच्या दरम्यान चंद्रकांत राऊत यांचे जावई मारुती पाटील हे कामानिमित्त गोव्याला जाताना त्यांना भेटण्यासाठी घरी आले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा व चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेले साहित्य पाहून चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सदर घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. तसेच दूरध्वनीद्वारे राऊत यांच्या मुलालाही कळविल्यानंतर तो कामावरून घरी परतल्यावर सदर घरफोडीची माहिती जांबोटी पोलीस आऊट पोस्टचे एएसआय कल्लाप्पा बडीगेर यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने ओलमणीला धाव घेऊन घरफोडीच्या घटनेची पाहणी करून पंचनामा केला. गेल्या पाच-सहा वर्षांच्या कालावधीत ओलमणी गावात घरफोडीची एकही घटना घडली नसल्यामुळे ग्रामस्थ निर्धास्त होते. मात्र बुधवारी भरदुपारी घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांनी त्वरित चोरीच्या घटनेचा छडा लावावा व गावात गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.