For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रावर होणार हॉटेल

06:06 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्रावर होणार हॉटेल
Advertisement

भविष्यकाळात चंद्रप्रवास ही नित्याची बाब होईल, हे गृहित धरुन अमेरिकेतील एका 22 वर्षीय युवकाने चंद्रावरच हॉटेल उभे करण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स आणि एनव्हिडीया यांसारख्या धनाढ्या कंपन्या या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करणार आहेत. येत्या काही वर्षांमध्ये या हॉटेलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थातच, हे हॉटेल प्रचंड महाग असणार, हे उघड आहे. या हॉटेलमध्ये वास्तव्य करायचे असेल, तर आपल्याला किती खर्च येणार, याची आकडेवारीही घोषित केली गेली आहे.

Advertisement

या हॉटेलात आपल्याला खोली बुक करायची असेल, तर 8.5 कोटी रुपयांचे डिपॉझिट भरावे लागणार आहे. एक रात्र या हॉटेलात वास्तव्य करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. तथापि, ही रक्कम 3.5 कोटी रुपयांपासून 83 कोटी रुपयांपर्यंत कितीही असू शकते, अशी अनधिकृत माहिती आहे. या हॉटेलची रचनाही आपल्या नेहमीच्या पंचतारांकित हॉटेलांसारखी असणार नाही. हे हॉटेल कापड आणि प्लॅस्टिक शीट्स्चे असेल. तसेच ते ‘इफ्लेटेबल’ असेल. याचा अर्थ असा की ते चंद्रावर नेण्यात येऊन ‘फुगविण्या’त येईल. प्रारंभी यात केवळ चार लोकांची वास्तव्याची सोय करण्यात येईल. नंतर मागणी पाहून त्याचा विस्तार केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

भविष्यकाळात चंद्रावरच्या मातीचा उपयोग करुन तेथेच विटा निर्माण करण्याची आणि या विटांच्या साहाय्याने स्थायी रचना असणारे हॉटेल निर्माण करण्याची योजना आहे. केवळ हॉटेलच नव्हे, तर मानवाला अधिक काळ वास्तव्य करता येईल, अशा प्रकारच्या वास्तू तेथे निर्माण करण्याची योजना आहे. या सर्व योजनांचा प्रारंभ या छोट्या हॉटेलपासून केला जाणार आहे. या हॉटेलचे डिझाईन सॅन फ्रान्सिस्को येथील ‘पॅलेस ऑफ फाईन आर्टस्’च्या धर्तीवर करण्यात आले आहे. ही कंपनी आपले प्रथम परीक्षण 2029 मध्ये करणार आहे. चंद्रावर प्रथम अशा प्रकारच्या वास्तू निर्माण केल्या जाऊ शकतात का, याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर, अंतिम डिझाईन सज्ज केले जाणार आहे. 2032 मध्ये या हॉटेलचे उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर ते वास्तव्यासाठी मोकळे केले जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.