एक भयानक प्रथा
जगातील आदिवासी जमातींमध्ये आजही अशा भयानक प्रथा पाळल्या जातात, की इतरांना त्यांसंबंधी चर्चा करणेही अवघड असते, ही वस्तुस्थिती आहे. पापुआ न्यू गिनी या देशात ‘फोर’ नावाची जमात आहे. या जमातीत काही वर्षांपूर्वीपर्यंत एक अशीच भीतीदायक प्रथा होती. या जमातीतील लोक आपल्या जमातीतील मृत लोकांचे मांस खात असत. त्यामुळे ही जमात नरमांसभक्षक म्हणून ओळखली जात असे. आफ्रिकेत अशा काही जमाती आजही आहेत, असे बोलले जाते. या ‘फोर’ जमातीचे वास्तव्य या देशातील घटदाट वनप्रदेशांमध्ये आहे. कालांतराने या देशाच्या सरकारने ही प्रथा कायदा करुन बंद पाडली आहे. तथापि, आजही या प्रथेची जगभरात चर्चा आहे आणि या प्रथेवर त्याकाळात बरेच संशोधनही झाले आहे.
या जमातीतील लोक असे का करत असत, याचे कारणही तितकेच स्वारस्यपूर्ण आहे. या जमातीतील लोकांचा असा विश्वास आहे, की माणसाचा आत्मा त्याच्या शरीरतच वास्तव्य करतो. शरीर मृत झाल्यानंतर त्याच्या मांसाचे सेवन केले, तर मृत व्यक्तीचा आत्मा हे मांस खाणाऱ्यांच्या शरीरात सामावला जाते. म्हणजेच एक प्रकारे तो मृत व्यक्ती जिवंत व्यक्तीच्या रुपाने स्थायी स्वरुपात जिवंत राहतो. या समजुतीपोटी या जमातीते ही प्रथा सहस्रावधी वर्षे पाळली होती. या प्रथेला इंग्रजीत ‘एंडोकॅनिबॉलिझम‘ अशी संज्ञा आहे. कॅनिबॉलिझम याचा अर्थ नरमांसभक्षण असा असून एंडो याचा अर्थ जमातीअंतर्गत असा आहे. एका विशिष्ट कारणाने या प्रथेचा अंत झिम्बाब्वे सरकारला कायदा करुन करावा लागला आहे. कायदा केल्यानंतरही ही प्रथा काही काळ राहिली. पण नंतर लोकांनीच ती सोडून दिली.
संशोधनातून असे लक्षात आले की कुटुंबातील जे लोक मृत व्यक्तीचे मांस खात असत, त्यांच्यापैकी अनेकांचाही नंतर जंतूसंसर्गाने मृत्यू होत असे. विशेषत: मृत व्यक्तीचा मेंदू जे कुटुंबातील सदस्य खात असत, त्यांना ‘कुरु’ नामक जीवघेणा विकार होत असे. मृत व्यक्तीच्या मांसात आणि मेंदूत विशिष्ट प्रकारचे रोगजंतू वाढत असल्याने हा विकार त्यांचे मांस खाणाऱ्यांमध्येही उतरत असे आणि त्यांचा मृत्यू होत असे. परिणामी, ही प्रथा कायदा करुन आता बंद करण्यात आली आहे.