सुरतमधील हिऱ्यांच्या संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
तिसऱ्या कार्यकाळात भारत टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये’ : भव्य-दिव्य ‘सुरत डायमंड बोर्स’ आंतरराष्ट्रीय संकुलाचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ सुरत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील सुरत येथे जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन केले. सुरत डायमंड बोर्स म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र आहे. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल, असे सुतोवाच करत ही आपली ‘हमी’ असल्याचे जाहीर केले. 2024 मध्ये भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदविणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील सुरत विमानतळ आणि सुरत डायमंड बोर्सच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटनावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. ‘सुरत डायमंड बोर्स’ हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असणार आहे. सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत स्थानिक संस्कृती आणि वारशाच्या अनुषंगाने बांधण्यात आली आहे. तर सुरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख स्क्वेअर फूटपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली असून ती जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्स आहे. हे सुरत शहराजवळील खजोद गावात आहे.
सुरत शहराच्या वैभवात भर
‘सुरत डायमंड बोर्स’ भारतीय डिझायनर, भारतीय साहित्य आणि भारतीय संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन घडवते, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी उद्घाटनप्रसंगी काढले. सुरत शहराच्या वैभवात आज आणखी एका हिऱ्याची भर पडली असून हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम असल्याचेही ते म्हणाले. सुरत डायमंड बोर्स हे नव्या भारताच्या नव्या ताकदीचे आणि नव्या संकल्पाचे प्रतीक आहे. या निर्मितीसाठी सुरतच्या आणि गुजरातच्या जनतेचे त्यांनी अभिनंदनही केले. आज सुरत हे डायमंड बोर्सच्या रूपाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले आहे. सुरत शहर एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होते. या शहरातील लोकांनी आपल्या मेहनतीने ते डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवले. तुम्ही मेहनत केली आणि सुरत हे ब्रिज सिटी बनले. आज सुरत हे लाखो तऊणांच्या स्वप्नांचे शहर असून आता सुरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत असल्याबद्दल समाधान्य व्यक्त केले.
जगात भारताची प्रतिष्ठा शिखरावर
सुरतच्या कष्टकरी जनतेने ‘मोदींची हमी’ प्रत्यक्षात येताना पाहिली असून ‘सुरत डायमंड बोर्स’ हेही या हमीचे उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या 10 वर्षात भारत आर्थिक शक्ती म्हणून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आता मोदींनी देशाला खात्री दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण भारताच्या बाजूने आहे. आज जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेड इन इंडिया आता एक मजबूत ब्रँड बनला आहे. म्हणूनच संकल्प करा आणि ते प्रत्यक्षात आणा, असेही मोदी उपस्थितांना म्हणाले.
‘सुरत डायमंड बोर्स’ हे हिऱ्यांच्या तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र असणार आहे. एक्स्चेंजमध्ये आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक ‘कस्टम क्लीयरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित व्हॉल्टची सुविधा यांचा समावेश आहे. ‘सुरत डायमंड बोर्स’ हे जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल असून त्यामध्ये 4,500 हून अधिक हिरे व्यापार कार्यालये आहेत. कच्च्या हिऱ्यांचा व्यापार आणि पॉलिश हिऱ्यांची विक्री करणाऱ्या अनेक कंपन्यांची येथे कार्यालये असतील.
दीड लाख नवीन रोजगार
‘सुरत डायमंड बोर्स’ अंदाजे 1.5 लाख नवीन रोजगार संधी निर्माण करेल. या इमारतीत कनेक्टिव्हिटीसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव येथे 4,000 हून अधिक पॅमेरे आणि अत्याधुनिक नियंत्रण कक्ष बांधण्यात आले आहेत. या कार्यालय संकुलाने अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनच्या मुख्यालयाच्या इमारतीलाही मागे टाकले आहे. ही इमारत सुमारे 3000 कोटी ऊपयांची असून त्यामध्ये 4,500 हिरे व्यापार कार्यालये आहेत. यावषी ऑगस्टमध्ये ‘सुरत डायमंड बोर्स’ इमारतीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून मान्यता दिली.