हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यापासून रोखले
बांगलादेशात गोविंद प्रामाणिक यांचा उमेदवारी अर्ज रद्द : बीएनपीचा कट असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात एकीकडे हिंदूविरोधी हिंसाचार सुरू असतानाच आता एका हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली आहे. देशात 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गोविंद चंद्र प्रामाणिक यांनी गोपालगंज-3 मतदारसंघातून संसदीय निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी त्यांचा अर्ज फेटाळला. 50 टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू मतदार असलेल्या गोपालगंज-3 मतदारसंघात यापूर्वी माजी पंतप्रधान शेख हसीना खासदार होत्या. आता तेथे गोविंद चंद्र प्रामाणिक अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छित होते. ते व्यवसायाने वकील असून ‘बांगलादेश जातीय हिंदू महाजोत’चे (बीजेएचएम) ते सरचिटणीस आहेत. ‘बीजेएचएम’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्न 23 संघटनांची हिंदुत्ववादी आघाडी आहे.
खालिदा झिया यांच्या पक्षावर गंभीर आरोप
बांगलादेशात अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवाराला त्यांच्या मतदारसंघातील 1 टक्के मतदारांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक असल्याची तरतूद आहे. या नियमाचे पालन करून गोविंद यांनी 1 टक्के मतदारांकडून स्वाक्षऱ्या घेत उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र, नंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचत आपल्या स्वाक्षऱ्या घेतल्याच नसल्याचा दावा काही मतदारांनी केला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व स्वाक्षऱ्या अवैध घोषित करत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. याप्रकरणी गोविंद यांनी खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या कार्यकर्त्यांनी मतदारांवर असे करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
मतदारसंघातील 51 टक्के मतदार हिंदू
गोविंद प्रामाणिक यांना विजयाची खात्री असल्याने ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छित होते. गोपालगंजमधील 3,00,000 मतदारांपैकी 51 टक्के मतदार हिंदू आहेत. बीएनपीला येथे जिंकण्याची शक्यता नसल्याने त्यांनी आपल्याला बाजूला केले, असे गोविंद यांनी म्हटले आहे. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करेन. जर मला न्याय मिळाला नाही तर मी न्यायालयातही जाईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.