परम मित्रासाठी साहाय्याचा ‘हात’
आपली प्रिय व्यक्ती, परम मित्र किंवा सहकारी अडचणीत असेल, त्याला साहाय्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कित्येकदा असे साहाय्य करताना बुद्धीकौशल्य पणाला लावावे लागते. मेक्सिको या देशात अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. या देशातील मेक्सिको या शहरात अल्बर्टो ओरोजको नामक व्यक्तीचा जन्म झाला. जन्मापासूनच त्याला हात नव्हते. त्याचा बालपणीचा मित्र जॉर्ज वेलाजको हा होता. मोठा झाल्यावर मी तुझ्यासाठी हात बनवून तुला देणार आहे, असे जॉर्ज वेलाजको याने त्याला सहज म्हटले होते. पुढे काही काळानंतर अल्बर्टो ही घटना विसरुनही गेला. तथापि, मित्राला दिलेला शब्द जॉर्जच्या अंत:करणात कोरला गेला होता. मोठेपणी जॉर्ज वेलाजको याने अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्याने रोबोटिक्सचे कौशल्य आत्मसात केले. नंतर त्याने आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी कृत्रिम हातांची निर्मिती केली. हे हात खऱ्या हातांसारखे सक्षम आहेत.
हात नसलेल्या व्यक्तींची मोठी सोय या हातांनी होते. या यांत्रिक हाताचे नामकरण ‘ई-रेडी“ असे करण्यात आले आहे. या हातावर एका स्नायू सेन्सरच्या साहाय्याने नियंत्रण ठेवले जाऊ शकते. या हाताचा उपयोगकर्ता ज्या प्रमाणे स्नायू सेन्सरला आज्ञा देतो, त्यानुसार हात काम करु लागतो. सध्या स्नायू सेन्सरची हालचाल करुन कृत्रिम हाताला आज्ञा दिली जाऊ शकते. मात्र, भविष्यकाळात ध्वनी सेन्सरच्या माध्यतातून हाताला आज्ञा देण्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्याची योजना आहे. हस्तविहीन व्यक्ती सहजगत्या या कृत्रिम हातांचा उपयोग करु शकतात. अर्थातच, नैसर्गिक मानवी हात ज्याप्रमाणे काम करतात, किंवा जितकी सहजता त्यांच्यात असते, तितकी या यांत्रिक हातांमध्ये नसते. तथापि, त्यांच्यात सुधारणा करण्याचे काम सध्या केले जात आहे. अशा हातांची मागणी आता वाढत असून हस्तविहीन व्यक्तींसाठी किवा हात गमावलेल्या व्यक्तींसाठी हे वरदान आहे.
जॉर्ज वेलाजको याने असे हात आता आपल्या बालपणीच्या परममित्राला दिले आहेत. त्यामुळे अल्बर्टो ओरोजको याला जणू नवजीवन मिळाले आहे. मित्राला सहज म्हणून दिलेला शब्दही त्याने पाळला, म्हणून जॉर्ज वेलाजको याचे इंटरनेटवर बरेच कौतुक होत आहे. त्याचा आदर्श साऱ्यांनी घ्यावयास हवा आणि ही परोपकारी वृत्ती संवर्धित करायला हवी, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.