Miraj Crime : मिरजमध्ये दोन कुटुंबांमध्ये तुफान राडा; महिलांकडून परस्पर दगडफेक
मिरज शहरात दोन कुटुंबात दगडफेक
मिरज : मिरज शहरातील मंगळवार पेठ, वडर गल्ली येथे महिलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणातून तुफान राडा होऊन एकमेकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या निखिल कलगुटगी याच्या खून प्रकरणानंतर मयत निखिल कलगुटगी व आरोपी चैतन्य कलगुटगी या दोन कुटुंबांतील महिलांमध्ये धुमश्चक्र झाली. याबाबत योगिता विश्वास कलगुटगी (वय ४०) आणि अक्षता चैतन्य कलगुटगी (वय २५) यांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. दोन्ही गटातील ११ महिलांविरुध्द गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
योगिता कलगुटगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत पद्मा सुरेश कलगुटगी, पूजा लखन कलगुटगी, अक्षरा चैतन्य कलगुटगी आणि तनुजा राजू कलगुटगी यांनी योगिता यांच्या घरावर दगडफेक केली. अक्षता चैतन्य कलगुटगी यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत अनिता विलास कलगुटगी, योगिता विश्वास कलगुटगी, प्रियांका सागर यमगर, निशा पाथरुट, शोभा यमकर व अन्य दोन अनोळखी महिलांनी दगडफेक केली. संबंधीत महिलांच्या दोन गटांमध्ये दुपारी भांडण झाले.. याचा राग मनात धरुन रात्रीच्या सुमारास शिवीगाळ व दमदाटी करत घरांवर दगडफेक केल्याचे परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, योगिता विश्वास कलगुटगी या मयत निखिल कलगुटगी याच्या काकू आहेत. तर अक्षता कलगुटगी या निखिल कलगुटगी खून प्रकरणातील आरोपी चैतन्य कलगुटगी याच्या पत्नी आहेत. निखिल याच्या खूनानंतर या दोन गटात खुन्नस आहे. याचेच पर्यावसन दिवसा भांडण आणि रात्री दगडफेकीत झाले. पोलिस तक्रारीत दगडफेकीच्या नेमक्या कारणाचा उल्लेख नसला तरीही खून प्रकरणाचीच याला किनार आहे. मयत आणि आरोपी अशा दोन तरुणांच्या दोन कुटुंबांतील नातेवाईकांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे दिसून येते. निखिल याच्या खून प्रकरणानंतर शहरात सराईत गुन्हेगारांमध्ये टोळी युध्द भडकण्याचीभीती असताना दोन तरुणांच्या नातेवाईकांमध्येच दगडफेक होऊन एकमेकांचा काटा काढण्यापर्यंत दुश्मनी वाढत चालली आहे.
या दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटाकडील ११ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. खून प्रकरणातील आरोपीवर हल्ले आणि बदला घेण्यासाठी पेटलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या पोलिसांसमोर आव्हान बनल्या असताना दोन गटात धुमश्चक्री होऊन एकमेकांच्या घरांवर दगडफेक होत असल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.