बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची हॅटट्रिक
लव्हलिना, परवीन आणि अंकुशचा गोल्डन पंच : भारतीय महिलांना रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण
वृत्तसंस्था / हाँगकाँग
आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारचा दिवस भारतासाठी गोल्डन डे ठरला. तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती आणि हॉकीत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. महिला तिरंदाजांनी रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. कुमकुम मोहोड, अंकिता भकत आणि किर्ती शर्मा या तीन खेळाडूंनी महिला रिकर्व्ह प्रकारात 10 वेळा चॅम्पियन राहिलेल्या दक्षिण कोरियाला 5-3 असे पराभूत केले. याशिवाय, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन (75 किलो), अंकुश पंघाल (पुरुष 80 किलो) आणि परवीन हुडा (65 किलो) यांनी अप्रतिम कामगिरीसह गोल्ड जिंकले आहे. भारताच्या सुजीत कालकलने पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात भारतीय पुरुष संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पदकतालिकेत भारतीय संघ 16 सुवर्णपदकासह एकूण 76 पदके जिंकत पाचव्या स्थानावर आहे.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात महिलांच्या 75 किलो वजनी गटात लव्हलिनाने चीनच्या बाओ झियीचा 5-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. रिंगमध्ये चिनी बॉक्सरला डोकेही वर काढू न देता, लव्हलिनाने हा सामना पूर्णपणे ‘वन-साइड’ करत भारताला सुवर्णमयी वाढदिवसाची भेट दिली. सामन्याच्या पहिल्या फेरीत लव्हलिनाने आपल्या उंचीचा आणि लांब हातांचा पुरेपूर फायदा घेत चिनी बॉक्सरला दूर ठेवले आणि अचूक पंचेस मारत आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत दणकेबाज विजय मिळवला आणि सुवर्ण जिंकले.
अंकुश पंघालचा गोल्डन पंच
पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताचा युवा बॉक्सर अंकुश पंघालने दक्षिण कोरियाच्या किम मिनसियोंगचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. 2018 च्या जकार्ता आशियाडमध्ये अमित पंघालने सुवर्ण जिंकल्यानंतर, तब्बल 8 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अंकुश हा पहिलाच भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे. याआधी 2026 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
परवीन हुडाची गोल्डन कामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी महिलांच्या 65 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात परवीनने चिनी तैपेईच्या चेन निएन चिन हिचा 3-2 असा पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, परवीन ही आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारी भारताची तिसरी महिला बॉक्सर ठरली आहे. यापूर्वी 2014 मध्ये दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिने तर 2026 च्या याच स्पर्धेत लव्हलिनाने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता.
महिला रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण
अंकिता भकत, कीर्ती आणि कुमकुम मोहोड या भारतीय त्रिकुटाने रिकर्व्ह महिला सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. अंतिम फेरीत भारताने बलाढ्या दक्षिण कोरियाचा पराभव करत या प्रकारातील पहिलेवाहिले सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या इतिहासात भारताने यापूर्वी महिला सांघिक रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेशही केला नव्हता. दक्षिण कोरियाचा संघ या प्रकारातील जगभरात सर्वात मजबूत मानला जात होता. 10 वेळा विजेतेपद पटकावलेल्या या संघाविरुद्ध भारताचे आव्हान कठीण होते. पण, फायनलमध्ये भारतीय खेळाडूंनी कोरियाला जबरदस्त टक्कर देत यशाला गवसणी घातली. दरम्यान, अमरावतीयच 17 वर्षीय कुमकुम मोहोडने जगातील सर्वोत्तम खेळाडूंसमोर अंतिम सामन्यात कोणत्याही तणावाशिवाय उत्कृष्ट कामगिरी केली.
पुरुष रिकर्व्ह प्रकारातही रौप्य
भारताकडून नीरज चौहान, यशदीप भोगे आणि धीरज बोम्मदेवरा या त्रिकुटाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष रिकर्व्ह सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जे देओक, किम वूजिन आणि ली वू सेक यांच्या संघाने तिरंदाजीतील आपला दबदबा कायम राखत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीय त्रिकुटाने कोरियाला तगडी फाईट दिली, पण सुवर्णपदकापासून मात्र वंचित रहावे लागले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारातील भारताचे हे चौथे पदक ठरले. याआधी 2006 आणि 2010च्या हंगामात भारताने कांस्यपदक पटकावले होते, तर 2022 मध्ये भारतीय संघाने रौप्यपदक जिंकले होते.
मिश्र रिकर्व्ह प्रकारात रौप्य
भारतीय तिरंदाज धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम मोहोड यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र रिकर्व्ह प्रकारात इतिहास रचला. धीरज आणि कुमकम जोडीने अंतिम फेरीत रौप्यपदकावर नाव कोरले. सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताला चीनकडून 3-5 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र रिकर्व्ह प्रकारात, कुमकुम आणि धीरज चीनविरुद्धच्या पहिल्या दोन सेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. परिणामी, चीनच्या जोडीने आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पिछाडीवरुन मुसंडी मारत कुस्तीत जिंकले गोल्ड
भारतासाठी सुजीत कालकलने अक्षरश: अशक्य वाटणारी कुस्ती मारत सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये त्याने ताजिकिस्तानच्या अब्दुलमाझिद कुडिएवचा पराभव केला. या लढतीत दुसऱ्या फेरीत सुजीत 2-9 असा पिछाडीवर होता. मात्र, त्याने जोरदार पुनरागमन करत 10-9 असा विजय मिळवला. सामना संपण्यासाठी अवघे 50 सेकंद बाकी असताना सुजीतने अशक्यप्राय असा विजय खेचून आणत जेतेपदाला गवसणी घातली. दरम्यान, त्याचे 65 किलो गटातील हे पदक खास ठरले. आपल्या यशाचे श्रेय त्याने प्रशिक्षकांना दिले आहे.
सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननला कांस्य
भारताची सेलर नेत्रा कुमानने एशियन गेम्समध्ये महिलांच्या डिंगी स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. काइयोह यॉट हार्बरमध्ये दोन शर्यतीच्या फायनल मालिकेनंतर नेत्राने 14 गुणासह स्पर्धा फिनिश केली. थायलंडची सोफिया माँटगोमरीने गोल्ड, तर सिंगापुरच्या जानिया यंगने रौप्यपदक पटकावले आहे. नेत्राने 2021 आणि 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या एशियन गेम्समध्येही तिने शानदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
सेपकटकरॉमध्ये भारताला कांस्य
सेपकटकरॉ या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या क्वाड्रन्ट उपांत्य फेरीत भारतीय संघाला जपानकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाला ही लढत 12-15, 13-15 अशा गुणांनी गमवावी लागली. यातील दुसरा सेट अतिशय चुरशीचा झाला. भारताने जोरदार लढत दिली. पण अखेर जपान संघाने बाजी मारली. त्याआधी भारतीय संघाने लाओस, व्हिएतनाम, म्यानमार यांच्यावर विजय मिळवित गट अ मध्ये आघाडीचे स्थान मिळविले होते. भारताला महिला संघाला मात्र प्राथमिक फेरीत थायलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.