जुळता सुरेल तारा
दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी’ असं एक कोडं आमच्या लहानपणी आम्हाला घातलं जायचं. किती विचार केला तरी काही केल्या त्या कोड्याचे उत्तर उमगत नसे. मग ते कोडं घालणारा दादा किंवा ताई डोळे मिचकावत. तरी आम्हाला त्याचा अर्थ कळत नसे. आणि मग शेवटी सांगितलं जायचं की अरे आपले दोन डोळे एकमेकांच्या शेजारीच असतात. पण एक डोळा दुसऱ्या डोळ्याला बघू शकत नाही. खरं आहे की नाही? या कोड्याचा अर्थ हा आहे. अनेक कोडी असतात आणि ती कोडी सोडवण्याची बुद्धिमत्ता बहुधा त्यातूनच हळूहळू विकसित होत असावी.
याला पुढे जाऊन परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी वगैरे म्हणत असावेत. पण तेव्हा तरी ते कळत नसे. आणि ज्याला ते उत्तर माहित आहे तो किती हुशार असं वाटायचं. त्या मागच्या अनेक गमती नंतर कळल्या. पूर्वी जेव्हा अशा स्पर्धा परीक्षांचे पेव फुटलेलं नव्हतं त्यावेळेला मनुष्याची तर्कबुद्धी उत्तम प्रकारे विकसित व्हावी यासाठीच प्राचीन भारतीय ज्ञानभांडारात असे कूट प्रश्न किंवा कोडी विपुल प्रमाणात आढळतात. आणि याचा संदर्भ शोधायला गेलो तर तो थेट संस्कृत साहित्यात न्यावा लागतो. म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी रचली गेलेली कित्येक संस्कृत कोडी आजही अभ्यासक्रमात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शिकवली जातात. मग या सगळ्या गोष्टी कशासाठी? मुळात माणसाची तर्कबुद्धी विकसित होणे हे तितकं महत्त्वाचं असतं का? असा प्रश्न मला पडला. नाही कधी विकसित झाली तर असा काय विशेष फरक पडणार आहे? आणि मग लक्षात यायला लागलं की आपल्या रोजच्या आयुष्यात जगताना असे अनेक निर्णय घ्यावे लागतात उद्या माझ्या आयुष्यात काय होणार आहे हे शोधण्यासाठी आज मला विचार करावा लागतो. आणि हा विचार करता करता एखादी गोष्ट का झाली याची कारणं शोधावी लागतात.
ती कारणं शोधताना अनेक गोष्टींचे एकमेकांशी असलेले संदर्भ कळत जातात आणि ह्या सगळ्या साखळ्यांची जुळणी केल्यानंतर आपल्याला जे जे प्रश्न पडलेले असतात त्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप समोर मिळतात. हे सगळं करण्यासाठी जी बुद्धिमत्ता वापरली जाते त्याला तार्किक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. अध्ययनाचा हा नियम आपल्याला सर्वांनाच ठाऊक असेल की एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव करत राहिल्याशिवाय त्यातलं मर्मदर्शन होत नाही. आणि एकदा मर्मदर्शन झालं की आपल्यासमोर असलेले प्रश्न सुटायला वेळ लागत नाही. गणित या विषयाच्या अभ्यासाने ही तर्कबुद्धी अधिकाधिक विकसित होत जाते असे म्हणतात. त्यामुळे गणितामध्ये हुशार असणाऱ्या व्यक्तींची तार्किक बुद्धिमत्ता उत्तम असते. पुढे पुढे जसे शिक्षणाचे स्तर उंचावत जातात त्याचप्रमाणे या तारक बुद्धीचा वापर करण्याचा आवाकाही वाढत जात असतो. अनेक उदाहरणं अशी समोर येत जातात की ज्याची माहितीच माणसाला नसते. प्रत्येक ठिकाणी नवे चॅलेंज असतात आणि नवीन विचार असतो, नवीन रचना असतात आणि एकातून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा साखळीत विविध प्रकारे आयुष्यात प्रगती होत असते. फक्त हेच आयुष्य असतं का असा प्रश्न पडेपर्यंत माणूस ही कोडी सोडवत बसतो. एका कोड्याच्या शेवटी दुसऱ्या कोड्याची सुरुवात असते. क्षितिज जसं लांबून दिसत असतं आणि जवळ गेल्यावर लांब लांब पळत असतं त्याचप्रमाणे एकेका कोड्याच्या पाठी माणसं धावत राहतात.
कोणत्याही गेम्समध्ये हीच कोडी असतात. जशी जशी ती कोडी सुटत जातील तशी तशी एक एक लेवल पुढे जायला येतं. प्रत्येक लेवल माणसाला जिंकण्याचा आनंद मिळवून देत असते आणि जशा त्यात पातळ्या पुढे जातील तशी काठिण्य पातळी वाढत जाते. जितका जटिल प्रश्न आपण सोडवू तितका आपला जिंकण्याचा कैफ असतो तो वाढत जातो. पुढे पुढे जाताना आपल्याला एवढे कळत नाही की आपण नक्की पोहोचलो ते कुठे पोचलोय? जिथेपर्यंत आपण चढत चढत वर आलोय तितकं आपल्याला परत खाली उतरता येईल का? ही कोडी सोडवण्याच्या मागे लागलेले आपण सर्वसामान्य जगात परत येऊ शकू का? आपण त्यासाठी रस्ता ठेवला आहे किंवा नाही? काही रस्ते असे असतात की जे फक्त चढत जाता येतात. उतरत मात्र येता येत नाही. अशा एखाद्या रस्त्याला तर आपण लागलेलो नाही ना? किंवा कोणाच्या मागे लागता लागता आपण वाट तर चुकलो नाही ना? पण नाही. स्वत:ची प्रगती करणे आणि नवनवीन आव्हानं स्वीकारून ती यशस्वी करणे यात दंग झालेली लाखो माणसं एखाद्या यंत्राप्रमाणे पुढे पुढे चाललेली असतात.
थोरामोठ्यांनी एक नियम घालून ठेवलाय. की एक विशिष्ट पातळीपर्यंत गेल्यावर थोडं थांबायचं. पाठीमागे वळून बघायचं. आजपर्यंतच्या आयुष्यात आपण काय घेतलं, काय दिलं, काय कमावलं आणि काय गमावलं याचा एक हिशोब मांडायचा. आणि मगच पुढच्या आयुष्यात आपल्याला कुठे, किती, कसा प्रवास करायचा आहे हे ठरवायचं. याला जुन्या भाषेत सिंहावलोकन असं म्हणतात. आजकाल ते कोणी करतच नाही. कारण धावण्यापुढे कोणालाच वेळ नसतो.
कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही उद्दिष्टासाठी अविश्रांत श्रम केल्यानंतर मग माणसाचं आयुष्यभराचं नुकसान हे ठरलेलं असतं. फुगा हा नक्की किती फुगवल्यावर फुटेल हे तो फुटल्यावरच कळतं. तसं ह्या कोड्यांच्या जंजाळात अडकून आपण नक्की कधी आवळले जाणार आहोत हे तो फास गळ्याभोवती बसतो तेव्हाच कळत असावं. पण तोपर्यंत आपण इतकी अदृश्य वजनं त्या फासाला लावलेली असतात, की कोड्यांच्या त्या महाभयानक जंगलातून आपण जीते जी परत येणे फारच कठीण असतं. त्याचं कारण स्पर्धा! लोक काय म्हणतील, यश, अहंकार, प्रतिष्ठा, ही आणि अशी अनेक वजनं आपण स्वत:च्या हाताने स्वत:वर असलेल्या ओझ्यावर लटकवतो. जिममध्ये गेलेला वेट ट्रेनिंग करणारा माणूस जसा जी वेट आपल्याला मारायची आहेत ती एकावर एक चकत्या अडकवून घेत असतो.
त्याचप्रमाणे आपण हे अदृश्य वजन एकसारखं आपल्या खांद्यांवर फिरवत असतो. जोपर्यंत आपल्या देहाला झेपेल एवढं वजन आपण व्यायामात उचलत असू तोपर्यंत आपलं शरीर उत्तम पीळदार होत जातं. आणि ज्या क्षणी शरीराला सहन होणार नाही असं वजन वहायला आपण सुरुवात करतो त्या क्षणी तुमचं शरीर झिजायला सुरुवात झालेली असते. म्हणूनच जिममध्ये व्यायाम करता करता कोसळलेल्या माणसांची किती उदाहरणं आहेत. पण शरीर ओरडून सांगत असतं की बास करा मला झेपत नाही. पण सिक्स पॅक करून दाखवीन या इर्षेने पेटलेला माणूस शरीराच्या ओरडण्याकडे सपशेल दुर्लक्ष करतो.
जशी कोडी निर्माण झालेली असतात तसं कुठे थांबायचं हे सांगणारी माणसं आजकाल तरी निर्माण होत नाहीत. झालीच तर त्यासाठी भरभक्कम पैसे मोजून त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. कदाचित म्हणूनच त्या सल्ल्याने माणसं बऱ्यापैकी वागायला लागलेली असतात. कारण त्यासाठी खिशाला मजबूत चाट पडते. पण घरातल्या किंवा मित्रमंडळीतल्या माणसाने फुकट दिलेला मोलाचा सल्ला आपण ऐकत नाही. कारण तेच एखाद्या गोष्टीचं मोल पैशात मोजायला लागल्याशिवाय त्याचं खरं मूल्य कळत नाही हेच खरं असतं आणि या साखळ्या वेळेत जुळवल्या तर मग
जुळल्या इतक्या सुरेल तारा
हवा दुजा गंधार कशाला?
हे म्हणता येतं.
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु