नगरपालिकांच्या 47 कोटींच्या निधीवर टांगती तलवार
कोल्हापूर / विनोद सावंत :
जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकेना जिल्हा नियोजनमधून दोन वर्षापूर्वी दिलेला निधी अद्यापी खर्च झालेला नाही. सुमारे 47 कोटींचा हा निधी आहे. पुढील चार महिन्यांत हा निधी खर्च झाला नाही तर शासनाला परत जाण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनावर अखर्चिक निधी परत जाण्याची टांगती तलवार असणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील दोन महापालिका आणि 13 नगरपालिकांना 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नगरोत्थान योजना, दलित्तेतर योजना, अग्निशमन योजना, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून सुमारे 103 कोटींचा निधी वितरीत केला होता. वास्तविक हा निधी दोन वर्षात म्हणजे 31 मार्च 2025 अखेर खर्च करणे आवश्यक आहे. परंतू यापैकी 47 कोटी 26 लाखांचा निधी अद्यपी खर्च झालेले नाही.
- मुदतवाढ केल्याने तीन महिन्यासाठी दिलासा
अखर्चिक 47 कोटींचा निधी या महिन्यांत खर्च झाला नसता तर शासनाला पुन्हा परत करावा लागला असता. परंतू राज्य शासनाने निधी खर्च करण्यासाठी 30 जुनपर्यंत मुदत वाढ केली आहे. या मुदतीमध्ये निधी खर्च झाला नाही तर मात्र, 47 कोटींचा निधी संबंधित मनपा, नपा प्रशासनांना राज्य शासनाकडे वर्ग करावा लागणार आहे.
- 147 कोटींसाटी मार्च 2026 पर्यंतची डेडलाईन
जिल्हा नियोजन समितीमधून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी दोन महापालिका आणि 13 नगरपालिकांना 147 कोटी 21 लाखांचा निधी वितरीत झाला आहे. हा निधी खर्च करण्यासाठी मार्च 2026 पर्यंत मुदत आहे. किमान हा निधी तरी मुदतीमध्ये खर्च होणे अपेक्षित आहे अन्यथा निधी माघारी जाण्याची टांगती तलवार असणार आहे.
- मनपा, नगरपालिकांना 2023-24 दिलेल्या निधीची स्थिती
योजना निधी वितरीत शिल्लक निधी
नगरोत्थान योजना 66 कोटी 90 लाख 32 कोटी 80 लाख
दलित्तेतर योजना 9 कोटी 10 लाख 2 कोटी 35 लाख
अग्निशमन योजना 5 कोटी 1 कोटी 25 लाख
नागरी वस्ती सुधार योजना एक 12 कोटी 6 कोटी 77 लाख
नागरी वस्ती सुधार योजना दोन 18 कोटी 60 लाख 4 कोटी 9 लाख
- मनपा, नगरपालिकानिहाय 2023-24 मधील वाटप केलेला निधी
मनपा, नगरपालिका निधी
कोल्हापूर महापालिका 26 कोटी 50 लाख
इचलकरंजी महापालिका 14 कोटी 80 लाख
जयसिंगपूर नगरपालिका 7 कोटी 75 लाख
कागल 9 कोटी 75 लाख
वडगांव 7 कोटी 25 लाख
गडहिंग्लज 8 कोटी 55 लाख
कुरूंदवाड 3 कोटी 65 लाख
मुरगुड 3 कोटी 30 लाख
मलकापूर 3 कोटी 50 लाख
पन्हाळा 2 कोटी 25 लाख
हुपरी 4 कोटी 30 लाख
शिरोळ 6 कोटी 80 लाख
आजरा 3 कोटी
चंदगड 3 कोटी 60 लाख
हातकणंगले 4 कोटी 75 लाख
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकेना 2023-24 मधील अखर्चिक निधी खर्च करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार 30 जुनपर्यंत हा निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. या दरम्यान, निधी खर्च करणे अपेक्षित आहे.
नागेंद्र मुतकेकर, जिल्हा सहाय्यक आयुक्त, नगरपालिका प्रशासन
- मनपा, नगरपालिकांना 2024-25 मध्ये वितरित झालेला निधी
नगरोत्थान योजना- 18 कोटी 49 लाख
दलित्तेतर योजना -79 कोटी 44 लाख
अग्निशमन योजना-5 कोटी 99 लाख
अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना- 21 कोटी 61 लाख