मूठभर आनंद...
मार्गशीर्षातले गुरुवार झाले की आमच्या आईची वाळवण घालायला सुरुवात व्हायची. आणि आम्ही मुलं मुठीमध्ये उन्हं भरून आणायचा खेळ खेळायचो. पौषातली पहाट बघणं देखील एक अप्रतिम अनुभव असतो. झिरझिरीत धुक्याची वस्त्र लेऊन येणारी किरणं म्हणजे एखादी लावण्यवती बघावी तसं काहीसं. सगळ्यात पहिल्यांदा आई तीळ धुवून कपड्यावर पसरायची, ते तिने सकाळीच पसरले की आजूबाजूला पक्षांचा चिवचिवाट सुरू व्हायचा. तो आवाज ऐकला की ओळखावं, आईनं काहीतरी खाण्याचा चांगला पदार्थ वर वाळवायला ठेवलाय. मग काय, आमची पण चोरटी पावलं तिकडे वळायची आणि थोडे थोडे करत तिळाच्या चिमट्या तोंडात टाकत शेवटी मुठी, मुठी तोंडात जायला लागायच्या. किलोभर वाळत घातलेले तीळ संध्याकाळपर्यंत अर्धा किलो केव्हा व्हायचे हे कोणालाच कळायचं नाही.
पण त्या मुठभर आनंदाच्या राशी कायमच्या स्मरणात कोरल्या जायच्या. आजी गुळाची राखण करायची तर दुसऱ्या बाजूला बाबांची भाजीवाल्यांकडून वेगवेगळ्या भाज्या आणण्याची तयारी सुरू व्हायची. कारण आणलेल्या भाज्या दोन दिवस आधी निवडून चिरून तयार ठेवाव्या लागायच्या. म्हणजेच आमच्या घरात पंधरा दिवस आधीच संक्रांत सुरू व्हायची अन् हा सगळा सोहळा पुढे रथसप्तमीपर्यंत चालायचा.
श्रावणात पेरलेल्या अनेक गोष्टी आता वेलीवरून लोंबकळताना दिसायला लागण्याचा हा काळ. सर्व वेलवर्गीय भाज्या पौषामध्ये अगदी नटून थटून तयार असायच्या. त्याच्या आस्वादाची श्रीमंती भोगायला मिळणारे आम्ही भोगी म्हणून साजरी करतो. आमचं जसं पोराबाळांचं, आजीआजोबांचं एकत्र कुटुंब असतं तसंच या वेलींचं, वृक्षांचं एकत्र कुटुंब असतं. त्या सगळ्यांचा लवाजमा एकदमच तयार झाल्याने या भाज्या एकदम खरेदी करून लेकुरवाळ्या स्वरूपात सगळ्यांच्या भेटीला येतात. त्याचा आस्वाद पूर्ण वर्षभरासाठी घ्यायला आम्ही या काळात अगदी आसुसलेले असतो. पौष महिना मात्र अशा या लेकुरवाळ्या भाज्यांच्या वैभवाने नटलेला असतो, म्हणूनच पौषाला श्रीमंत भोगी असेही म्हणतात. श्रावणात बांधलेले वेलींचे झोपाळे भाज्यांसह सर्वत्र झुलतांना दिसू लागले की संक्रांतीची चाहूल लागायची. वेलींना झुलवणारा वारा, कल्पनेने वरती आकाशात भरारी घ्यायला मोकळा व्हायचा, रंगीबिरंगी पतंगासारखा डौलाने भिरभिरत राहायचा. एवढासा कणभर तीळ पण आमच्या शरीरात मणभर उष्णता निर्माण करतो म्हणून त्याचं महात्म्य वेगळंच. त्याच्या जोडीला गुळही सज्ज असतोच. हे तीळ आणि गुळ आम्ही थंडी कमी व्हावी म्हणून जास्त खातो आणि मग या सगळ्याचा प्रभाव काही दिवसातच आमच्या चेहऱ्यावर किंवा नको त्या जागी उष्णतेचे फोड येऊन जाणवायला लागायचा. पण अशा या तिळगुळाने मात्र आमची मराठी भाषा श्रीमंत आणि समृद्ध केली आहे. अनेक म्हणी या तिळामुळे, गुळामुळे निर्माण झाल्या आणि बोलण्याला खुसखुशीत खुमारी आली.
संत तुकाराम महाराज देव भक्तच्या भेटीसाठी काकुळतीला आला असताना सांगताना लिहीतात...‘देव तिळी आला, गोड गोड जीव झाला....’ पण हे तीळ तीळ तुटण्यासाठी कमालीचे प्रेम, स्नेह, भक्ती निर्माण व्हायला या तीळगुळालाच प्रतिक मानून आम्ही गोड बोला म्हणून सांगत राहतो. बालपणी आईच्या कडेवर बसून शुभंकरोती म्हणतांना, ‘तिळाचं तेल कापसाची वात’ म्हंटले की या तिळाचं महात्म्य पहिल्यांदा कानावर पडतं. आणि नंतर थेट अलिबाबाच्या कथेत हा तीळ जादुची गुहा उघडायला हजर असतो...‘ तिळा तिळा दार उघड.....’ आता मात्र तिळाची ताकद कळून चुकते.
हाच तीळ संक्रांतीला साखरेची पांढरी आवरण लपेटून, पार्लर मध्ये रंग लेवून काटेरी हलवा बनून येतो. आता कवितेत त्याच्या इवल्याशा रूपाला हसणारे वाटाणा, शेंगदाणा भेटतात तेव्हा मात्र हा तिळ धिटुकला वाटतो. अशा या तिळाची सोबत आयुष्यभर असतेच. अगदी श्वास संपल्यानंतर तिलांजली देऊनच सोबत संपते.