For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वन टच फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांकडून निराधार मायलेकाला मदतीचा हात

09:42 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘वन टच फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांकडून निराधार मायलेकाला मदतीचा हात
Advertisement

उपचारासाठी आल्यानंतर पैशाचे पाकीट हरवल्याने झाले होते हतबल

Advertisement

वार्ताहर /सांबरा

गांधीनगर येथील सर्व्हिस रोडशेजारी बसलेल्या निराधार मायलेकाला वन टच फाउंडेशन या सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे करून त्यांना त्यांच्या घरी पाठविले.  अंबिकानगर दांडेली येथील रहिवासी विनायक मुरकुंबी हा आपली आई जयलक्ष्मी हिला उपचारासाठी म्हणून पुण्याला घेऊन गेला होता. उपचार घेऊन परतत असताना त्यांचे पैशांचे पाकीट हरविले. आधीच हलाखीची परिस्थिती त्यात पैशांचे पाकीट हरविले. मुलगा विनायक हा अपघातग्रस्त असून आई आजारी आहे. अशा परिस्थितीत स्वत:कडे असलेले जेमतेम पैसेही हरविल्याने त्यांना घरी जाणेही मुश्कील होऊन बसले. मायलेकाने कसेबसे बेळगाव गाठले व ते मदतीची अपेक्षा करत गांधीनगरनजीक येऊन पोहोचले व तेथे कोणाकडून मदत मिळते काय यासाठी प्रयत्न चालविले. मात्र त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही, शेवटी मायलेक रस्त्याच्या बाजूला हतबल होऊन बसले. त्याचवेळी बाळेकुंद्री खुर्द येथील एक युवक बेळगावला जात असताना त्यांची ही परिस्थिती पाहून त्याने लगेच वन टच फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांना याबाबतची माहिती दिली. विठ्ठल पाटील यांनी तातडीने धाव घेऊन त्यांची विचारपूस केली व क्षणाचाही विचार न करता त्यांना मदतीचा हात पुढे केला. त्यांना रिक्षातून बसस्थानक येथे घेऊन गेले व चहा नाश्ता देऊन, खर्चाला पैसे देऊन त्यानंतर अंबिकानगर दांडेलीच्या बसमध्ये त्यांना बसवून घरी पाठवुन दिले. त्यामुळे विठ्ठल फोंडू पाटील यांचे कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.