वेंगुर्लेत योगसाधनेसाठी सभागृहाची निर्मिती करावी - उमेश येरम
योगोपचार शिबिर संपन्न ; पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला योगाच्या शास्त्रीय योग साधनेतून शरीरांस व मानसिकतेस आलेला थकवा दूर करता येतो. तसेच शरीर व मन चैतन्यमय होऊन शरीर निरोगी ठेवता येते. यासाठी वेंगुर्ले शहरात नगर परिषदेने शहरातील नागरिकांना योग साधनेसाठी सभागृहाची निर्मिती करावी. त्या दृष्टीने आपण नगर परिषदेकडे पाठपुरावा करणार आहे. असे शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक उमेश येरम यांनी संयुक्त योगोपचार शिबिराचा समारोप कार्यक्रमात स्पष्ट केले.वेंगुर्ले भटवाडी येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संयुक्त योगोपचार शिबिरामध्ये पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत विशेष योगाभ्यास घेण्यात आला. ५ दिवसांचे हे संपुर्ण योगशिबिर दि ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधी पर्यंत यशस्वीपणे संपन्न झाले. अनेक योगसाधकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन योगाभ्यासाचा लाभ घेतला. या शिबिराचा सांगता समारंभ कार्यक्रम बुधवारी सकाळी योगवर्गात घेण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरात वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, ओम योग साधना वेंगुर्लेच्या योग शिक्षिका सौ. साक्षी बोवलेकर, वेंगुर्ला येथील व्यायाम शाळा व दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते उमेश येरम, माझा वेंगुर्ला समन्वयक निलेश चेंदवणकर, संजय तेरेखोलकर आदींचा सहभाग होता.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी, जसे स्वच्छतेत आरोग्य हि संकल्पना वेंगुर्ले नगर परिषदेने यशस्वी राबविण्यासाठी स्वच्छतेचे उपक्रम राबवित यशस्वीता साधली. तसेच योगसाधनेतून शहर वासिय निरोगी रहावेत. यासाठी वेंगुर्ले कँम्प येथील स्व. मधुसूदन कालेलकर नाट्यगृहाच्या बहुउद्देशीय इमारतीच्या जागेतील हाँल हा योगसाधनेसाठी नागरिकांकरीता खुला करावा. वेंगुर्ले नगरपरिषदेचे योगाकेंद्र म्हणून वेगळा उपक्रम सुरु करावा. त्यासाठी प्रयत्न नगर परीषदेकडे करणार असल्याचे स्पष्ट केले.
योगशिबीर आयोजन शेखर बांदेकर यांचा सत्कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला शहरात योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. त्या अनुषंगाने पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने संयुक्त योगोपचार शिबिराचे खास आयोजन पतंजली योग समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांनी केले होते. त्या बद्दल शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पतंजली समितीचे विविध पदाधिकारी व कुडाळ, सावंतवाडी मधील काही योगशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरामध्ये पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांनी सतत ५ दिवस शिबीर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींनी आभार व्यक्त केले.या शिबिरासाठी वेंगुर्ले भटवाडी येथील दिलीप मालवणकर यांनी सिद्धिविनायक हॉल मोफत उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या शिबिराचे सुत्रसंचानल संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत केरवडेकर यांनी केले.या शिबिरास सुमारे ६० महिला व पुरुष योग साधकांची दररोज उपस्थिती या शिबिरास लाभली. शिबिर संपले तरी सिद्धिविनायक हॉल, वेंगुर्ला येथे दि ४ एप्रिल पासून नियमित योगवर्ग सुरू राहणार असून त्यात सर्वांनी सहभाग घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास शिकावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.