Sangli : सांगली बालाजी मिल रोडवर भीषण हिट-एंड-रन; चार वाहनांचे नुकसान, सात जखमी
वेगाने आलेल्या चारचाकी वाहनामुळे सांगलीत अपघात
सांगली : सांगली शहरातील बालाजी मिल रोड परिसरात रविवारी रात्री भीषण हिट अँड रनचा अपघात घडला. या अपघातात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले तसेच सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, एक स्कोडा कंपनीच्या चारचाकी वाहन चालकाने वेगात येऊन नियंत्रण सुटल्याने आधी एका दुचाकीला धडक दिली, त्यानंतर आणखी दोन गाड्यांना धडक देत ते वाहन पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन धडकून थांबले. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की घटनास्थळी एक गाडी उलटून नुकसानग्रस्त झाली, तर इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
धडकेत जखमी झालेल्यांना नागरिकांच्या मदतीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताची माहिती घेतली जात आहे. धडक देणाऱ्या चारचाकी चालकाला जमावाने मारहाण केली.
तसेच गाडीची ही तोडफोड केली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर या परिसरातील वाहतुकीवरील नियंत्रण आणि वेगमर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.