महिलांच्या टोळक्याने भरदिवसा घरात घुसून दागिने लांबवले
रत्नागिरी :
शहरानजीक जे. के. फाईल्स जवळ राहणाऱ्या कल्पना भिसे यांच्या घरात पाच-सहा महिलांनी घुसून कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले. मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना भिसे या एमआयडीसी येथे राहतात. याच घराला लागून त्यांच्या मुलाची जाहिरात कंपनी आहे. मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास या कंपनीत काम करणाऱ्या मुली जेवायला बसलेल्या असताना 'पाच ते सहा महिलांनी घरात प्रवेश करत कपाटातील दागिने लंपास केले. या महिला घरात घुसल्याचे लक्षात येताच कल्पना भिसे आणि कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलांनी हाताला लागेल त्या वस्तू उचलून नेल्या. राजस्थानी पेहेरावात असणाऱ्या या महिलांसोबत एक लहान मुलगी देखील असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या महिलांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.