मैदानी स्पर्धेसाठी पंच होण्याची नामी संधी
कोल्हापूर / संग्राम काटकर :
खेळात करिअर करायची जिद्द असलेल्या जिह्यातील तरुण-तरुणींना मैदानी खेळ पंच होण्याची संधी मिळवता येणार आहे. जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवरील पंच अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या आणि आंतरराष्ट्रीय पंच वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या माध्यमातून होता येणार आहे. फक्त त्यासाठी मैदानी खेळाची माहिती असणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे वर्षभर कष्ट केल्यास जिह्यासह राज्य, राष्ट्रीय पातळींवरील परीक्षा देता येईल. एकदा राज्य, राष्ट्रीय पंच परीक्षेतून आपली काबिलियत सिद्ध झाली की आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो. त्यामुळे जिह्यातील तरुण-तरुणींनी मैदानी खेळांचा पंच म्हणून करिअर करण्याची उपलब्ध असलेली नामी संधी सोडू नये, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनकडून केले जात आहे.
कोल्हापूर जिह्यात दरवर्षी शाळा, कॉलेज व संघटनात्मक पातळीवर होणाऱ्या तब्बल 24 मैदानी खेळांच्या अनेक स्पर्धा होत असतात. या स्पर्धांसाठी पंचांची कमतरता भासत आहे. ही कमतरता भऊन काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. असोसिएशनच्या माध्यमातूनच ऑल इंडिया अॅथलेटिक्स डीटीओ तांत्रिक पंच परीक्षाही देता येणार आहे. ही परीक्षा लेखी व तोंडी स्वरूपाची आहे. या परीक्षा देण्यापूर्वी उमेदवाराला आठवड्याचा ऑनलाइन कोर्स करावा लागतो. त्याचा अभ्यासक्रम अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने बनवलेला असतो. कोर्सनंतर 100 गुणांची लेखी आणि 30 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना जिल्हा, राज्य मैदानी स्पर्धेत पंचगिरी करता येते.
- राज्यस्तरीय पंच परीक्षा
राज्य पातळीवरील पंच परीक्षेला फेडरेशन स्टेट टेक्निकल ऑफिशियल लेव्हल-बी या नावाने ओळखले जाते. ही परीक्षा जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये 60 व त्याहून अधिक टक्के गुण मिळवलेला आणि मैदानी स्पर्धेत पंचगिरी केल्याचा दोन वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार देऊ शकतो. परीक्षा देण्यापूर्वी उमेदवारांना सहा दिवसांचा कोर्स करावा लागेल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर 100 गुणांची लेखी आणि 50 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी लागते. 50 गुणांची तोंडी परीक्षाही होते. परीक्षांमध्ये जो उमेदवार 60 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त करतो तो उत्तीर्ण मानला जातो. उत्तीर्ण उमेदवाराला राज्य व राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत पंचगिरी करण्याची संधी मिळते.
- राष्ट्रीय पंच परीक्षा
फेडरेशन टेक्निकल ऑफिशियल लेव्हल-ए असे राष्ट्रीय पंच परीक्षेचे नाव आहे. ही परीक्षा राज्य पंच परीक्षेत 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेला उमेदवार देऊ शकतो. या उमेदवारालाही 6 दिवसांचा शैक्षणिक व मैदानी अभ्यासक्रमावर आधारीत असलेला कोर्स करावा लागतो. कोर्सनंतर लेखी 100 गुणांची आणि 50 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी लागते. 50 गुणांची तोंडी परीक्षाही द्यावी लागते. या तिन्ही परीक्षामध्ये जो उमेदवार 70 किंवा त्यापेक्षा जास्त टक्क्यांवर गुण प्राप्त करतो तो उत्तीर्ण मानला जातो. हा उत्तीर्ण उमेदवार स्थानिकपासून ते राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत पंचगिरी करू शकतो. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाला पंधराशे ते दोन हजार रुपये आणि येण्या-जाण्याचा खर्च मिळतो.
- नॅशनल टेक्निकल ऑफिशियल एक्झाम
वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या वतीने नॅशनल टेक्निकल ऑफिशियल एक्झाम घेण्यात येते. या परीक्षेला टेक्निकल ऑफिशियल एज्युकेशन अँड सर्टिफिकेशन सिस्टीम लेव्हल वन या नावानेही ओळखले जाते. ही परीक्षा फेडरेशन टेक्निकल ऑफिशियल लेव्हल-ए परीक्षा सत्तर किंवा त्यापेक्षा जास्ती टक्केवारी मिळवलेला उमेदवार देऊ शकतो. या परीक्षासाठी वर्ल्ड अॅथलेटिक्सने बनवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित 10 दिवसांचा कोर्स करावा लागतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर लेखी परीक्षा 100 गुणांची. प्रॅक्टिकल परीक्षा 50 गुणांची व तोंडी परीक्षा 50 गुणांची द्यावी लागते. या तिन्ही परीक्षामध्ये जो उमेदवार 80 किंवा त्यापेक्षा जास्त टक्क्यांवर गुण प्राप्त करतो तो उत्तीर्ण ठरतो. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत पंचगिरी कऊ शकतो.
- न्यू लेव्हल परीक्षा
जगभरामधील कोणत्याही देशात वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या वतीने न्यू लेव्हल परीक्षा घेतली जाते. वर्ल्ड अॅथलेटिक्स रेफ्री ब्रांझ लेवल या नावानेही परीक्षेला ओळखले जाते. ही परीक्षा नॅशनल टेक्निकल ऑफिशियल एक्झाम उत्तीर्ण उमेदवार देऊ शकतो. शिवाय त्यांच्याकडे राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत तीन वर्षे पंचगिरी केल्याचा आणि व्याख्याने देण्याचा व मार्गदर्शन केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. परीक्षा देण्यापूर्वी पंधरा दिवसाचा कोर्स असतो. परीक्षेनंतर उमेदवारांचे मूल्यांकन करून एकुण उमेदवारांपैकी प्रत्येकी अडीचशे महिला पुरुषांना आंतरराष्ट्रीय ब्रांझ लेव्हल पंच म्हणून घोषित केले जाते.
- लेव्हल-टू वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्वर लेव्हल
23 वर्षे पूर्ण असलेला आणि आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत चार वर्षे पंचगिरी केलेला उमेदवार लेव्हल-टू वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्वर लेव्हल ही परीक्षा देऊ शकतो. या परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होण्यासाठी संबंधित उमेदवाराला आपली काठीण्य पातळी उच्च दर्जाची करावी लागते.
- लेव्हल-3 वर्ल्ड अथलेटिक्स सिल्वर लेव्हल...
वर्ल्ड अॅथलेटिक्सतर्फे लेव्हल-3 वर्ल्ड अथलेटिक्स सिल्वर लेव्हल ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा वयाची 28 वर्षे पूर्ण असलेला आणि आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सिल्वर लेव्हलच्या पातळीवरील 4 कामाचा अनुभव असलेला उमेदवार देऊ शकतो.
स्पर्धेसाठी सुमारे 254 मैदानी पंचांची गरज आहे. सध्या 110 पंचच कोल्हापूर जिह्यात कार्यरत आहेत. त्यांच्यावर जिह्यातील स्पर्धांचा ताण आहे. त्यामुळे जिह्यातील आजी-माजी मैदानी खेळाडूंनी पंच होण्यासाठी पुढे यावे. संबंधीतांना राज्यपासून आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.
-प्रकुल मांगोरे-पाटील (सचिव : कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन)