नववर्षाचे जोरदार स्वागत
ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड अन् किरिबातीमध्ये सर्वप्रथम जल्लेष
वृत्तसंस्था/ ऑकलंड
भारतापेक्षा काही वेळेअगोदर स्वत:च्या प्रमाणवेळेनुसार काही देशांमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यात ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि किरिबातीचा समावेश होता. न्युझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये आतिषबाजीसह नववर्षाचे स्वागत करण्यात आले. देशातील सर्वात उंच इमारत स्काय टॉवरवरून आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. दक्षिण प्रशांतच्या देशांनी सर्वप्रथम 2025 या वर्षाला निरोप दिला.
सर्वप्रथम नव्या वर्षाचे स्वागत किरिबातीच्या किरीटीमाटी बेटावर झाले. किरिबातीला किरिबास असेही संबोधिले जाते. येथे भारतापेक्षा 8 तास 30 मिनिटांपूर्वी नव्या वर्षाची सुरुवात झाली. तर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी हार्बर येथे नववर्षाचा जल्लोष करण्यापूर्वी बॉन्डी बीचवरील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रपतींच्या देशवासीयांना शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वत:च्या संदेशात त्यांनी सर्व नागरिकांना राष्ट्राचा विकास, सामाजिक सद्भाव आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल स्वत:ची प्रतिबद्धता आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. नवे वर्ष नवी ऊर्जा आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. 2026 हे वर्ष आमच्या जीवनात शांतता, सुख आणि समृद्धी आणणारे ठरावे अशी देवाकडे प्रार्थना करते. नवे वर्ष एक मजबूत आणि अधिक समृद्ध भारताच्या निर्माणासाठी नव्या ऊर्जेचा संचार करेल अशी आशा मुर्मू यांनी व्यक्त केली आहे.