दक्षिण आफ्रिकेत उभारले जाणार भव्य मंदिर
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
अबुधाबीनंतर बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) आता दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठे मंदिर उभारत आहे. हे मंदिर जोहान्सबर्गच्या सुंदर लॅनसेरिया कॉरिडॉरमध्ये 37 हजार चौरस मीटरच्या क्षेत्रात तयार केले जात आहे.
बीएपीएसनुसार मंदिर अन् सांस्कृतिक परिसराच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून पुढील तीन वर्षांमध्ये हे मंदिर तयार होणार आहे. यापूर्वी मागील वर्षी फेब्रुवारीत अबुधाबीमध्ये मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांचे उद्घाटन बीएपीएसकडून करण्यात आले होते. यानंतर बीएपीएसने दक्षिण आफ्रिकेत या मंदिरासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
मागील महिन्यात मंदिराच्या 33 हजार चौरस मीटरमध्ये फैलावलेल्या सांस्कृतिक परिसराचे उद्घाटन करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 2500 चौरस मीरटच्या परिसरात पारंपरिक मंदिरावर काम सुरू होणार आहे. सुंदर लॅनसेरिया कॉरिडॉरमध्ये निर्माण होणाऱ्या या मंदिराला बहुसांस्कृतिक विनिमय, विविध धर्मांदरम्यान संवाद आणि दक्षिण आफ्रिकेत बीएपीएसच्या मानवीय कार्यांचे केंद्र करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या मंदिराच्या प्रकल्पाचे अनावरण केले होते. यंदा दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जी-20 परिषदेदरम्यान मोदी पुन्हा या परिसराला भेट देतील अशी आशा असल्याचे बीएपीएस दक्षिण आफ्रिकेचे प्रवक्ते हेमांग देसाई यांनी म्हटले आहे.
बीएपीएस हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक परिसर दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायाच्या समर्पणाचा पुरावा असणार आहे. येथील भारतीय समुदायाने वर्णभेदाच्या प्रतिकुलतेचा सामना केला आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय समुदायांचे स्थायी योगदानाचे स्मरण करून देत हे मंदिर आगामी पिढ्यांसाठी एक वारसा ठरणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले आहे.