संगमेश्वरमध्ये शंभूराजांचे भव्य स्मारक
रत्नागिरी :
राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात संगमेश्वर येथे महापराक्रमी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 100 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात येत असून येथील विमानतळाची 147 कोटी रुपयांची कामेदेखील प्रगतीपथावर असल्याचे जाहीर केले. कोकणच्या दृष्टीने महत्वाच्या अशा बंदर विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य विकासासाठी 240 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
रत्नागिरी विमानतळ विकासासाठी यापूर्वी जवळपास 97 कोटी ऊपयांची मान्यता 2022 मध्ये मिळाली होती. परंतु अधिकच्या जागेचे भूसंपादन व वाढत्या महागाईमुळे या कामांच्या किमतीत वाढ झाल्याने सुमारे दीडशे कोटींची आवश्यकता होती. या निधीला प्रशासकीय व वित्तीय मान्यता राज्य शासनाने दिली होती. सोमवारी सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पात विमानतळाची 147 कोटींची कामे प्रगतीपथावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरीचे विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. पण या विमानतळाचा विकास करण्यासाठी तेथे प्रवासी वाहतुकीसाठी वेगळे टर्मिनल व रस्ते उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. विकासासाठी राज्य शासनाने यापूर्वीच दीडशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातून नवीन टर्मिनल इमारतीसह लिंक टॅक्सी वे, जोडरस्त्यांसह अन्य कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही कामे जलदगतीने सुरू आहेत. पालकमंत्री सामंत यांनी याकडे विशेष लक्ष घातलेले आहे. त्यामुळे या कामाला वेग मिळाला आहे. केंद्र शासनाच्या ‘रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वी या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1372 मीटर होती. ती आता 2135 मीटर वाढवण्यात आली आहे. यासाठी 25 हेक्टर जमीनही संपादित करण्यात आली आहे.
- आज कसबा येथे शपथ घेणार- प्रमोद जठार
छत्रपती संभाजी महाराज हे त्यागाचे सर्वोच्च प्रतीक आहेत. त्यांचे 50 एकरामध्ये स्मारक व्हावे, यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमी तिथे मंगळवारी शपथ घेणार असल्याचे भाजपाचे नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांचा मंगळवारी बलिदान दिवस असून सकाळी 10 वाजता संगमेश्वरातील महामार्गापासून कसब्यापर्यंत महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नीतेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, आदी दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती जठार यांनी दिली.
- लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर - उदय सामंत
मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार अशा अफवा पसरविण्यात येत आहेत़ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात यासाठी 36 हजार कोटी ऊपयांची तरतूद केली आह़े त्यामुळे ही योजना बंद होणार म्हणणाऱ्यांना सडतोड उत्तर पवार यांनी अर्थसंकल्पातून दिले आह़े विरोधकांकडून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी अर्थसंकल्पावर केली जात असल्याचा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाणला आहे.
सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर निधीमध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आह़े तसेच उद्योगांसाठी 6 हजार कोटी ऊपयांचा प्रोत्साहनपर निधी तर उद्योग विभागाच्या प्रशासनासाठी दीड हजार कोटी ऊपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आह़े त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे सामंत यांनी सांगितल़े