शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ शनिवारी भव्य मेळावा
आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती : शिवालय येथे महामार्ग समर्थनार्थ बैठक
कोल्हापूर
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा भव्य मेळावा शनिवार ८ रोजी आयोजित केला आहे. मार्केट यार्ड परिसरातील मुस्कान लॉन येथे सकाळी ११ वाजता मेळाव्यास सुरुवात होईल. मेळाव्यास खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. शिवालय येथे रविवारी शक्तिपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये मेळाव्याचे नियोजन करण्यात आले.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग समर्थक शेतकरी बांधवांची एकजूट होत आहे. विरोधकांकडून होणारी दिशाभूल प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांच्या लक्षात येत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या महामार्गास समर्थन देण्यासाठी पुढे येत आहेत. मेळाव्यास हजारो शेतकरी बांधव उपस्थिती लावतील असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह पर्यटन विकाससह रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. जिल्ह्याच्या टोकाशी असलेला भुदरगडसारखा ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. त्यामुळे हा महामार्ग व्हावा, अशी प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांची भूमिका असल्याचे जाधव यांनी सांगितले. महिला प्रतिनिधी रुचीला बाणदार यांनी, शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ लोकप्रतिनिधींची पाठिंबा पत्रे घेतली जात आहेत. महामार्गाच्या समर्थनार्थ जिह्यासह राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी सकारात्मक असून यात पुढाकार घेत असल्याचे सांगितले.
बैठकीस शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, शेळोलीचे सरपंच प्रशांत देसाई, देवर्डेचे विजय हवालदार, नेर्ली - विकासवाडीचे अमोल मगदूम, नवनाथ पाटील, आनंदा धनगर, मकरंद चौगले, सांगवडेवाडीचे राजेश जठार, दत्ता रावळ, पट्टणकोडोलीचे रोहित बाणदार, आनंदा बाणदार, व्हन्नूरचे रघुनाथ पाटील, कागलचे संदीप मालवेकर, गणेश मालवेकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.