भाई देऊलकर यांच्या देहदान संकल्पाचा समाजासमोर चांगला आदर्श
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे प्रतिपादन
ओटवणे प्रतिनिधी
देहदान हे एक सामाजिक कार्य असुन त्यासारखे महान कार्य नाही. आपले जीवन समाज कार्यासाठी अर्पण केलेल्या भाई देऊलकर यांनी आपल्या वयाच्या ७६ व्यावर्षी देहदानाचा संकल्प करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा देहदानाचा हा निर्णय मोक्षाकडे नेणारा आहे. असे प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजु परब यांनी केले.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या देहदान व नेत्रदान अभियान अंतर्गत भाई देऊळकर यांच्यासह अनेकांनी देहदान व नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यावेळी संजू परब बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, सिंधु रक्तमित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुका अध्यक्ष सुनिल राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, पत्रकार शामसुंदर देऊलकर, दीनानाथ बांदेकर, रिक्षा संघटनेचे नेते सुधीर पराडकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बबन साळगावकर यांनी भाई देऊलकर यांच्या देहदानाच्या निर्णयाचे कौतुक करीत त्यांना भगवद्गीता भेट दिली. यावेळी सुनिल राऊळ यांनी भाई देऊलकर यांनी परंपरेला छेद देत देहदानाच्या घेतलेला निर्णय समाजाला संदेश देणारा आणि उच्च कोटीचा विचार असुन त्यांचा देह पुण्यवंत करणार असल्याचे सांगितले. यावेळी सुधीर पराडकर यांनी भाई देऊलकर यांनी देहदानाचा चांगला निर्णय घेतल्याचे सांगत आपल्या नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. यावेळी भाई देऊलकर यांचे सुपुत्र शामसुंदर देऊलकर यांनी वडिलांनी देहदानाचा निर्णय घेताना जुन्या रुढी-परंपरांना सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी जवळच्या लोकांना हा निर्णय पटवून दिला. त्यामुळे देहदानाचा फायदा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश तेंडोलकर म्हणाले, देह व अवयव दानातून समाजात रुढी-परंपरेला बाजूला ठेवून दातृत्वाचे एक नवीन रूप निर्माण होत आहे ही समाधानाची बाब आहे. परदेशातील अवयव दानाच्या प्रमाणात भारतात हे खूपच कमी आहे. जगभरात नेत्र, देह व अवयव दानाचे महत्त्व वाढत असून याचे महत्त्व कळू लागल्याने आता ही एक चळवळ म्हणून उभी राहत आहे. त्यामुळे हे दान जात धर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या मृत्यूनंतर कुणाला तरी जीवन देऊया असा विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अभियानात स्वतःहून सहभागी होतील. भाई देऊलकर यांच्यासह इतरांच्या देहदान व नेत्रदानाच्या निर्णयामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल. देहदान वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. यावेळी इतर उपस्थित मान्यवरांनी देहदान आणि नेत्रदान हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आणि समाजासाठी उपयुक्त असे निर्णय आहेत. या निर्णयामुळे अनेक गरजू लोकांना जीवनदान मिळू शकते किंवा त्यांचे जीवन सुकर होऊ शकते असे विचार व्यक्त केले. यावेळी भाई देऊलकर यांनी आपल्या वडिलांची देहदानाची इच्छा होती मात्र ते करू शकले नाही. आपण परंपरेला बाजूला ठेवून देहदानाचा निर्णय घेतला आहे. जीवनात आपण अनेक कामे केली पण देहदानाचा निर्णय घेताना मला विशेष समाधान वाटत आहे. तसेच माझ्यासह देहदान व नेत्रदान करणाऱ्या सर्वांना सिंधु रक्तमित्र संघटनेकडून प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी भाई देऊलकर यांच्यासह आंबोली सैनिक स्कूलमधील परमेश्वर सावळे, सर्पमित्र महेश राऊळ यांनी देहदानाचा तर सुधीर पराडकर, संजय पिळणकर, त्यांच्या पत्नी सौ. समृद्धी पिळणकर, श्रीम. सरीता मुननकर यांनी नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश तेंडोलकर यांनी आभार पत्रकार शाम देऊलकर यांनी मानले.