सोनेरी नौदल ताफा... स्वप्न की सत्य?
ट्रम्प यांना गोल्डन या नावाचे फार आकर्षण आहे मग व्हिसा असो कोणती योजना असो त्याला ते गोल्डन हे नाव देऊन मोकळे होतात कारण त्यामुळे त्यांना आपण अमेरिकेला पुन्हा सुवर्ण विभागणी देत आहोत अशी खात्री वाटू लागते. अमेरिकन नौदलात सशस्त्र विमानवाहू सुसज्ज जहाजांचा म्हणजे युद्धनौकांचा नवा काफीला वाढविण्याची ही योजना आहे. या लढाऊ युद्ध पोतामध्ये पुढील पाच दहा वर्षात 25 पेक्षा अधिक नौकांची भर पडेल आणि त्यापैकी किमान दोन-तीन युद्धनौका पुढील सहा महिन्यात बांधल्या जातील असा ट्रम्प यांना विश्वास वाटतो.
मेगाचा नवा प्रयोग
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ मेगा ही योजना अफलातून आहे. त्यात किती यश येते हे इतिहास ठरवेल पण तूर्त तरी डोनाल्ड ट्रम्प एकाहून एक सोनेरी कल्पना मांडून अमेरिकन जनतेला झुलवत आहेत. गोल्डन व्हिसा यानंतर आता गोल्डन फ्लिट अशी नवी कल्पना मांडून सरत्या वर्षाच्या शेवटी ट्रम्प यांनी अमेरिकेला एक धक्का दिला आहे. 22 डिसेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत फ्लोरिडा येथे त्यांनी या योजनेचा आराखडा जाहीर केला.
अद्भुत अफलातून
अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आरमार बांधणीला गोल्डन फ्लिट म्हणजे सोन्याचा ताफा असे नाव देऊन इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. अमेरिकन नौदलाला नवे तेजस्वी रूप देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे आता भविष्यकालीन वाटचालीवर अवलंबून आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही योजना खरोखरच अद्भुत आहे, अफलातून आहे आणि नाविन्यपूर्ण आहे. अमेरिकेचे नौदल अधिक शक्तिशाली अत्याधुनिक आणि तेवढेच तुल्यबळ बनविण्याचा हा त्यांचा संकल्प आहे. पूर्वीपेक्षा अमेरिकन नौदलाला 100 पटीने अधिक बलवान बनविण्याचा आपला इरादा आहे असे ट्रम्प यांनी नेहमीच्या थाटात हात उंच करून सांगितले.
ट्रम्प महोदयांच्या या सोनेरी नौदल ताफ्याची ठळक वैशिष्ट्यो पाहता असे दिसते की त्यांना अमेरिकेच्या सातव्या आरमारापेक्षाही आता अधिक बलाढ्या आरमार ताफा उभा करावयाचा आहे. असा ताफा उभा करण्यासाठी बराच कालावधी लागेल, परंतु नाताळच्या मुहूर्तावर त्यांनी या योजनेचा श्री गणेशा जरूर केला आहे. त्यांच्या शंखनादाचा आवाज बीजिंगपर्यंत किती पोहोचतो यावरून त्यांचे गणित आणि समीकरण किती यशस्वी होते, याची प्रचिती येते. सोनेरी ताफा योजनेचे पंख खरोखर सोनेरी आहेत काय? ट्रम्प महोदय प्रथम श्रेणीच्या लष्करी आरमारी नौदलाची निर्मिती करू इच्छितात, या योजनेचा केंद्रबिंदू ट्रम्प द क्लास म्हणजे प्रथम श्रेणीची युद्ध नौकांची निर्मिती करणे हा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अद्भुत योजनेचे अंतरंग काय असेल तर आपली ढासळलेली लष्करी ताकद पुन्हा उभी करणे हे आहे. अमेरिकेच्या नौदलासाठी नव्याने कल्पित ही योजना असून तिचा केंद्रबिंदू आहे अत्याधुनिक शक्तिशाली सागर सामर्थ्याची जोपासना असे पहिले जहाज अमेरिका (ँँउ1) लवकरच बांधणार असून हे जहाज आतापर्यंत बांधलेल्या सर्व युद्धनौकापेक्षा 100 पटीने अधिक शक्तिशाली असेल असे आश्वासन ट्रम्प महोदय देतात. मारेलागो येथे ही योजना घोषित करताना त्यांनी म्हटल्याप्रमाणे आकर्षक युद्ध नौकांचे आणि त्यांच्या स्वत:च्या प्रतिमेचे प्रदर्शन केले गेले आहे. काही जुने काही थकलेले आणि जुने झालेले अवशेष मागेच टाकून आपण नव्या दिशेने जाणार आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. 880 फूट आणि 35 हजार टन वजनाचे सुपर कॉम्बॅट जहाज हे चीनच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी म्हणून स्थापित करण्याची योजना आहे.
त्यांच्या नौदल महत्त्वाकांक्षा बीजिंगच्या वेगाने वाढणाऱ्या नौदल प्रभावाविरुद्ध एक प्रतिबंधक उपाय आहे. ते अमेरिकन लष्करी वर्चस्व राखण्यासाठी मदत करेल आणि अमेरिकन जहाज बांधणी क्षेत्रास बुडत असलेल्या उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यास सहाय्यक ठरेल. अमेरिकेच्या शत्रूंमध्ये देखील भीती निर्माण करेल असे त्यांना वाटते. ही योजना धाडसी आहे ती धोकादायक देखील आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर नौदलाने आतापर्यंत केलेले सर्वात मोठे भूपृष्ठीय लढाऊ जहाज अमेरिका बांधू शकेल की नाही हाच खरा प्रश्न होता. आता अमेरिकेची जुनी जहाज बांधणी प्रणाली बदलून ट्रम्प नवी रचना करत आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन मोठे गोजिरे आहे.
या कार्यक्रमासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत, रखडलेले शिप गार्ड जुनी औद्योगिक व्यवस्था कमी होत असलेल्या क्षमता अपुरा कर्मचारी वर्ग, क्षेपणास्त्रांची अप्रमाणिक आणि जुनी कार्यप्रणाली अशा काही अडथळ्यांना तोंड देत अमेरिकेला नौदल पुनर्रचना करावी लागेल. यामुळे गंभीर प्रश्नही निर्माण होतील. मानवरहित प्रणाली हायपरसोनिक ड्रोन युद्धाच्या बदलत्या युगात महाकाय युद्ध नौका बांधणे हे योग्य उत्तर आहे काय असा प्रश्नही त्यांचे टीकाकार विचारत आहेत.
संकल्पना आणि दृष्टी
ट्रम्प यांच्या प्रथम श्रेणीच्या युद्धनौकेची वैशिष्ट्यो कोणती असतील तर त्यामध्ये एक मोठे चित्र रंगविले आहे पण ते प्रशासनाच्या पचनी पडेल का? त्यांचा युक्तिवाद सरळ आहे. चीन अमेरिकेपेक्षा वेगाने जहाजे बांधत आहे, त्यांचे संख्याबळ मोठे आहे. बीजिंगला रोखण्यासाठी वॉशिंग्टनला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अधिक प्रभावी तंत्रज्ञान, अधिक शक्तिशाली आणि अधिक पोहोच असलेली क्षमता सिद्ध करावयाची आहे. परंतु कालबाह्य तंत्रज्ञान आणि अवाढव्य खर्च यामुळे ही योजना किती यशस्वी होते हा खरा प्रश्न आहे? टीकाकारांना असे वाटते की ट्रम्पचे उपाय चीनच्या प्रत्यक्ष रणनीतीशी टक्कर देऊ शकतील काय? प्रगत तंत्रज्ञानाची जोपासना करण्याऐवजी जुन्या तंत्राच्या आधारे मोठी जहाजे बांधणे हे आता कालबाह्य होत आहे. सर्वात शक्तिशाली प्रतीक असलेल्या विमानवाहू जहाजांच्या भविष्याबद्दल अस्वस्थ प्रश्न निर्माण झाले आहेत. काही विश्लेषकांचा असा दावा आहे की आधुनिक युद्धाचा फंडा बदलला आहे. पॅसिफिक ते युक्रेनपर्यंत झालेले सारे बदल हे सांगतात की नव्या तंत्राचा प्रसार हा जुन्या नौकांना मागे टाकत आहे. लहान जहाजे मानवरहीत युद्ध प्रणाली आणि अनेक प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या मोठ्या संख्येच्या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला निर्णायक प्रहार करणे कठीण होते. कोरियन इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अनालिसिस रिसर्च या संस्थेच्या संशोधक यु येऊन यांच्या मते लहान युद्ध नौका आणि मानवरहित प्रणालीचे फायदे असे असतात की त्यांची संख्या तुलनेने कमी असते. तसेच कमी किमतीत ती वाढविता येतात. अनेक व्यासपीठावर धोका पत्करून व्यवहार्य योजना आखता येतात आणि प्रभाव वाढविता येतो. पश्चिम पॅसिफिकमधील आपल्या प्रवेशाला आव्हान देण्याच्या क्षमतेजवळ अमेरिकेला चीनची चिंता वाटणे साहजिक आहे. बदलती युद्धप्रणाली मानव आणि मानव रहित क्षेपणास्त्र योजना आणि कमी जागेत प्रतिकार करण्याची वाढती क्षमता यामुळे ट्रम्प यांच्या या नव्या संकल्पनेची काल सुसंगतता किती आहे हा प्रश्न पडतो? मुळातच अमेरिकेचा जहाज बांधणी कार्यक्रम अगदी कमी गतीने चालू आहे. अनेक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर