काहीही खाणारी चिमुरडी
फर्निचर देखील खाण्याचा प्रयत्न
घरातील मुलांना उत्तम आहार मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. याकरता ताज्या भाज्या, फळे आणि अन्य गोष्टी मागविल्या जातात. परंतु तरीही घरातील मूल अन्नाऐवजी गादी, रजई आणि भिंतीवरील प्लास्ट खाऊ लागल्यास किती विचित्र वाटेल?
एका 3 वर्षीय मुलीला अजब आजार असून ती घरात असलेली कुठलीही गोष्ट गिळू पाहते. सोफा, गादी, रजई आणि काच देखील ती खाण्याचा प्रयत्न करते. विंटर नाव असलेली ही मुलगी काहीही खाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. अनेकदा तर ती जीवासाठी धोकादायक असणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचत असते.
स्टैसी एहेर्ने नावाच्या 25 वर्षीय महिलेला तिची 3 वर्षीय मुलगी घरात असलेली कुठलीही गोष्ट खात असल्याने चिंता सतावत आहे. विंटर घराच्या भिंतींवरील प्लास्टर ओरबाडून खाते. सोफ्याचे फॅब्रिक आणि त्यातील स्पंज देखील खात असते. लाकडी फर्निचर आणि काच देखील खाण्याचा प्रयत्न ती करते. रात्री तिची झोपमोड झाल्यास ती स्वत:चे ब्लँकेटही खाऊ लागते. सुदैवाने विंटरला आतापर्यंत कुठलीही गंभीर ईजा झालेली नाही.
मुलीचे हे वर्तन एका आजारामुळे निर्माण झाले आहे. तिला एक दुर्लभ ईटिंग डिसऑर्डर आहे. या आजाराने पीडित व्यक्तीला खाण्यायोग्य नसलेल्या गोष्टी खाण्याची इच्छा होत असते. याप्रकरणी अधिक काही करता येणार नसल्याचे डॉक्टरांचे सांगणे आहे. यामुळे तिची आई विंटरवर सदैव नजर ठेवून असते.