30 वर्षांनी गावात मुलीचा जन्म
एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ शकते का? पहिल्या नजरेत हा प्रश्न विचित्र वाटू शकतो, परंतु इटलीतील एका छोट्या पर्वतीय गावात हे घडले आहे. येथे मुलीच्या जन्माने पूर्ण जगाचे लक्ष या गावाने वेधून घेतले आहे.
इटलीच्या अब्रूजो क्षेत्रात वसलेले पगलियारा देई मारसी गावाची ही कहाणी आहे. पर्वतांदरम्यान वसलेल्या गावाची लोकसंख्या काळासोबत कमी होत गेली. युवा लोक शहरांमध्ये स्थलांतरित झाले, शाळा बंद पडल्या आणि गावाच्या गल्ल्यांमध्ये माणसांपेक्षा मांजर अधिक दिसू लागली. मागील 30 वर्षांमध्ये गावात एकाही मुलाचा जन्म झाला नव्हता. अलिकडेच या गावात एका मुलीने जन्म घेतला आहे. या मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर आल्यावर ही बातमी जगभरात चर्चेत आली आहे. मागील वर्षात या गावात तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर एका मुलीने जन्म घेतला. या बातमीने पूर्ण गावात जल्लोष झाला. वृद्धांसाठी हा क्षण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता, कारण त्यांनी स्वत:च्या आयुष्यात अशाप्रकारचा आनंद पाहण्याची आशाच सोडून दिली होती. गावात जन्मलेल्या या मुलीचे नाव लारा ठेवण्यात आले. लाराच्या आईचे वय 42 वर्षे तर पित्याचे वय 56 वर्षे आहे. लाराच्या जन्मासोबत गावाची लोकसंख्या वाढून जवळपास 20 झाली आहे. चर्चमध्ये तिचा बाप्तिस्मा समारंभ पूर्ण गावाच्या उपस्थितीत झाला, ज्यामुळे हा क्षण आणखी खास ठरला.
लाराच्या जन्माच्या प्रारंभी ही बातमी केवळ गावापुरती मर्यादित राहिली. परंतु काही काळानंतर लाराची आई चिंजिया त्राबुक्को यांन सोशल मीडियावर स्वत:च्या मुलीची छायाचित्रे आणि भावुक पोस्ट शेअर केली. या छायाचित्रांमध्ये पर्वतीय गाव, चर्च आणि शांत वातावरणादरम्यान लाराची उपस्थिती दिसून आली. ही पोस्ट व्हायरल होऊ लागली. यानंतर गावाशी निगडित छायाचित्रे आणि काही वेगवेगळ्या सोशल मीडिया पेज अणि प्रसारमाध्यमांमध्ये शेअर होऊ लागली. एका गावात 30 वर्षांपासून कुठलेच मूल जन्माला आले नव्हते हे कळल्यावर लोक चकित झाले.
सरकार अन् माध्यमांचे लक्ष
या कहाणीने इटलीत कमी होणाऱ्या जन्मदराच्या चर्चेला पुन्हा वेग मिळाला आहे. इटलीत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने जन्मदर कमी होतोय. 2024 मध्ये देशात जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या ऐतिहासिक स्वरुपात कमी राहिली आणि प्रजननदर 1.18 पर्यंत खाली आला. याच संदर्भात लाराचा जन्म एक आशेची कहाणी ठरला आहे. सरकारकडून बेबी बोनस यासारख्या योजनांच्या चर्चेदरम्यान ही बातमी समोर आल्याने याला मोठे स्वरुप मिळाले.