चराठा येथे दोन घरावर सागाचे महाकाय झाड कोसळले
दोन लाखांचे नुकसान; सुदैवाने दुर्घटना टळली
ओटवणे | प्रतिनिधी
चराठा तळखांबवाडी येथे शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसात दोन घरावर सागाचे महाकाय झाड कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेवेळी दोन्ही घरात माणसे होती. मात्र सुदैवाने ही सर्वजण बालंबाल बचावली. गजानन नारायण बांदेकर आणि दत्तप्रसाद नारायण बांदेकर यांची एकमेकाला लागूनच घरे असून घरालगतच्या २५ फुटावरील महाकाय उंच सागाचे झाड या दोन्ही घरांवर कोसळल्याने गजानन बांदेकर यांच्या किचन रूमसह पडवीचे वासे रिप कौलांसह छप्पर निकामी झाले. तर दत्तप्रसाद बांदेकर यांच्या किचन रूम सह संडासचे वासे रिप कौलांसह छप्पर निकामी झाले. सुरेश रामचंद्र परब यांचा माड अर्ध्यावरून तुटून चराठा - ओटवणे या मुख्य रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. गावात इतर ठिकाणीही झाडांच्या फांद्या कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळी तलाठी सुप्रिया घोडके यांनी पाहणी करत पंचनामा केला.