महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक 10 रोजी
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये शहरातील विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या 20 कोटींच्या नुकसानभरपाईचा प्रश्न गाजत आहे. मूळमालकाला जागा दिल्याने सत्ताधारी गटानेही नाराजी व्यक्त केली असून या बैठकीमध्ये त्यावर खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महापौर सविता कांबळे यांच्या कक्षामध्ये मंगळवारी याबाबत काही नगरसेवक आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील बैठकीमध्ये जे विषय मांडण्यात आले, त्यावर चर्चा करून त्यांना मंजुरी देणे, लेखा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जे ठराव झाले, त्यांनाही मंजुरी देण्याचा विषय या बैठकीत घेण्यात येणार आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्यावरदेखील चर्चा केली जाणार आहे. सध्या वॉर्ड क्र. 4 मध्ये विविध कामे सुरू आहेत, त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. आझमनगर येथे आश्रम व मंदिर बांधणीसंदर्भात मंजुरी देणे, रस्ता, ड्रेनेज दुरुस्तीसाठी ज्या तक्रारी आल्या आहेत त्यावर चर्चा करून संबंधित विभागाला सूचना केली जाणार आहे. एलअॅण्डटी कंपनीबाबतही सत्ताधारी गटनेते यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यावर चर्चा केली जाणार आहे. याचबरोबर विरोधी गटाचे गटनेते मुजम्मील डोणी यांच्या सहमतीनेच ही बैठक बोलाविण्यात आली असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 10 रोजी होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. शहापूर येथील ‘त्या’ जागेसंदर्भात आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. एकूणच या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवरही चर्चा या बैठकीत होणार आहे.