Kolhapur Breaking : शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी मुरगुडातून जेरबंद !
स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगूड पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : पाच वर्षाहून अधिक काळ सेवा शिल्लक असणाऱ्यांना तसेच नव्याने नियुक्ती होण्यासाठी शिक्षकांना सक्तीची करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक ( TET )पात्रता परीक्षा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला. या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून मुरगुड पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक समाविष्ट झालेले आहेत. अनेक केंद्रावर ही परीक्षा सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकही सहभाग असून, हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्यामध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. अत्यंत गोपनीय माहिती घेत सावधपणे पोलिसांनी काल सायंकाळपासून या घटनेचा तपास केला. रविवारी मध्यरात्री पोलीस पथकाने या टीईटी पेपर फोडणाऱ्या टोळीला जेरबंद केले. अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता सूत्राकडून व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आणि टोळीत कोणाकोणाचा समावेश आहे याची उत्सुकता असून मुरगुड पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.