केवळ दोन हजार रुपयांच्या वादावादीतून मित्राने मित्राचाच पाडला मुडदा
सौंदत्ती पोलिसांकडून आरोपीला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
सौंदत्ती एपीएमसीच्या आवारात दोन दिवसांपूर्वी नरगुंद तालुक्यातील एका गवंडी कामगाराचा खून झाला होता. त्याच्याच मित्राने केवळ दोन हजार रुपयांच्या वादातून हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून सौंदत्ती पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मक्तुमसाब नदाफ (वय 34) राहणार कलकेरी, ता. नरगुंद असे खून झालेल्या गवंडी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रफिक मेनशिनकाई (वय 25) राहणार मुनवळ्ळी याला अटक करण्यात आली आहे. रफिकही गवंडी काम करीत होता. हे दोघे चुळकी, ता. सौंदत्ती येथे एका बांधकामावर काम करीत होते.
गुरुवार दि. 5 जून रोजी सकाळी सौंदत्ती एपीएमसी आवारातील एका दुकानासमोर मक्तुमसाबचा मृतदेह आढळून आला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. बांधकाम मालकांकडून पगारापोटी घेतलेल्या दोन हजार रुपयांवरून मक्तुमसाब व रफिक यांच्यात वादावादी होऊन रफिकने दगडाने ठेचून मक्तुमसाबचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.