मोदी मित्र, तरीही युद्ध थांबविण्याचा आग्रह
युक्रेन युद्ध संपावे, याकरता मोदींच्या चांगल्या सूचना
वृत्तसंस्था, मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र असल्याचे सांगत, मोदी सातत्याने युक्रेन युद्ध संपवून शांततेचा मार्ग शोधण्याचा आग्रह धरत असल्याचे म्हटले आहे. मॉस्को येथे झालेल्या ‘व्हाल्दाई डिस्कशन क्लब’च्या कार्यक्रमात पुतीन यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 5 वेळा आंतरराष्ट्रीय मंचांवर युक्रेन युद्धाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी प्रत्येक भेटीत युक्रेन युद्ध थांबवण्याचा आणि शांततेचा मार्ग शोधण्याचा मुद्दा उपस्थित करतात. युद्ध लवकर संपावे, अशी त्यांची भूमिका असून, त्यासाठी मोदींकडे काही चांगल्या सूचना आहेत असे पुतीन म्हणाले.
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर शांतता आणि संवादाची भूमिका मांडली आहे. मागील महिन्यातही मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेत पुतीन यांनी युक्रेनमधील परिस्थिती तसेच शांततेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती मोदींना दिली होती.
फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा अंत करण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा आणि राजनैतिक प्रयत्न सुरु आहेत. व्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही यापूर्वी भारताच्या कोणत्याही शांतता उपक्रमाचे रशिया स्वागत करेल असे म्हटले होते. रशिया आणि भारत कूटनीतिद्वारे वाद सोडविण्याच्या मताचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
भारताची विविधता जगासाठी प्रेरणादायी
पुतीन यांनी भारताच्या विविधतेचेही कौतुक केले आहे. भारतातील अनेक भाषा, संस्कृती आणि मोठी लोकसंख्या असूनही देश एकसंधपणे पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील विविधता आणि एकतेतून जगाला शिकण्यासारखे आहे. विविधता कायम ठेवून वेगवेगळ्या समुदायांचे लोक एकत्र कसे राहू शकतात, याचे भारत उदाहरण असल्याचे पुतीन यांनी म्हटले.
..तर सर्व शस्त्रांचा वापर करू
रशिया युरोपातील कोणत्याही देशावर हल्ला करण्याची योजना आखत नसल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले. मात्र, रशियाच्या कोणत्याही भागावर हल्ला झाल्यास देशाच्या सुरक्षेसाठी उपलब्ध सर्व शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. पाश्चिमात्य देश आणि युरोप रशियासोबतच्या संभाव्य संघर्षासाठी तयारी करत असल्याचा आरोप पुतीन यांनी केला. बाल्टिक समुद्रातील लष्करी सराव आणि रशियन जहाजांवरील कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. कलिनिनग्राड भागाला उर्वरित रशियापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केल्यास रशिया स्वत:च्या रक्षणासाठी अण्वस्त्र वापरू शकतो असा इशारा यापूर्वी क्रेमलिनकडून नाटोला देण्यात आला होता.