मोकाट गायीने दिला वासराला जन्म
मनपा कर्मचाऱ्यांनी केले गाय-वासराला गो-शाळेत दाखल
बेळगाव : ऑटोनगर येथील नंदिनी मार्गावर गायीने वासराला जन्म दिला. भर पावसातच गाय आणि वासरू होते. त्यामुळे काही जणांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत फोन केला. त्यानंतर तातडीने मनपाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी त्या गाय आणि वासराला वाहनातून श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये नेले. शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ती जनावरे शहरामध्ये मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरांमध्ये ठाण मांडून राहात आहेत. बऱ्याच वेळा वाहतुकीला अडथळाही निर्माण करत असतात. तर काहीवेळा ती जनावरे अशक्त होऊन रस्त्याच्या बाजूलाच पडून राहतात. गुरुवारी नंदिनी मार्गावर एका गायीने वासराला जन्म दिला. त्यानंतर ती गाय त्याच ठिकाणी बसून होती. ऊन आणि पावसामुळे वासराचा जीव धोक्यात आला होता. महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी राजू संकण्णावर हे काही कर्मचाऱ्यांना घेऊन त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी वाहनातून गाय व वासराला गो-शाळेत नेले.