ईडीच्या पाच राज्यांमध्ये धाडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘कोल्डप्ले’ आणि दिलजीत दोसांज यांच्या संगीत कार्यक्रमाच्या तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करणाऱ्या टोळ्यांविरोधात प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) जोरदार कारवाई केली आहे. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाच राज्यांमधील पाच महत्वाच्या शहरांमध्ये ईडीने शनिवारी धाडी टाकल्या. दिल्ली, मुंबई, चंदीगढ आणि बेंगळूर या शहरांच्या या धाडसत्रात समावेश होता.
संगीत कार्यक्रमांच्या तिकिटांचा काळाबाजार करुन या टोळ्यांनी अनेक कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमावल्याचा आरोप आहे. या शहरांमध्ये या दोन कलाकारांचा ‘दिल-ल्युमिनटी’ नामक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या धाडींमध्ये अनेक कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत. हा तिकिट घोटाळा या कागदपत्रांमधून बाहेर येईल, असे प्रतिपादन ईडीकडून करण्यात आले आहे.
बनावट मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून या टोळ्या या कार्यक्रमांच्या तिकिटांची अवैध विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. या टोळ्यांनी मूळ तिकीटांप्रमाणे भासणारी बनावट तिकिटे लाखोंच्या संख्येने तयार करुन संगीतप्रेमींची फसवणूक चालविली आहे. तसेच या तिकीटांची विक्री मूळ किंमतीपेक्षा चार-पाच पट अधिक किमतीला केली जात आहे. काही तिकिट खरेदीदारांनी यासंबंधी तक्रार नोंदविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.